नवी दिल्ली : पुलवामात दहशतवाद्यांनी भारतीय सुरक्षा दलावर सर्वात मोठा भ्याड हल्ला केलेला असताना शेजारी असलेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान गप्प आहेत. जगभरातून या हल्ल्याचा निषेध केला जात असताना इम्रान खान मात्र गप्प बसलेत. त्यांनी निषेधाचा ट्विटही केला नाही. किंवा शोकसंदेशही दिलेला नाही. इम्रान खान यांचं मौन म्हणजे दहशतवाद्यांचं समर्थन आहे का असा सवाल विचारला जातोय. इम्रान खान हे दहशतवादीधार्जिणे आहेत का, असा सवाल विचारला जात आहे. पाकिस्तानच्या या भूमिकेमुळे जागतिक समुदायापुढे पाकिस्तानचा बुरखा फाटला आहे.
बारामुल्ला हल्ल्यानंतर चीनचा दुटप्पीपणा पुन्हा समोर आला आहे. जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यास चीनने पुन्हा एकदा नकार दिला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत निवेदन जारी केले आहे. संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताने सातत्याने अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी करण्याचा प्रस्ताव दिला. मात्र चीनने आपला नकाराधिकार वापरून कायमच यात अडसर आणला आहे. पुलवामा हल्ल्यानंतरही ड्रॅगनची अतिरेक्यांविषयी मवाळ भूमिका बदललेली नाही.
३५० किलो स्फोटकांनी भरलेल्या ट्रकद्वारे जैश ए मोहम्मदच्या अतिरेक्याने गुरुवारी पुलवामा जिल्ह्य़ात भीषण आत्मघातकी हल्ला घडवून आणला. यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४४ जवान शहीद झालेत. गेल्या दोन दशकांतील हा सर्वात मोठा हल्ला आहे. जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे. दहशतवादी आदिल अहमद दार याने हा हल्ला घडवला. आदिल काकापोरा येथील रहिवासी अशून त्याने स्फोटकांनी भरलेल्या गाडीने जवानांच्या बसला धडक दिली.
सुटी संपवून सेवेत रुजू होणाऱ्या २,५४७ जवानांना ७० वाहनांतून नेले जात होते. दर खेपेस हजार जवानांना नेले जात असत. मात्र, यावेळी संख्या दुपटीपेक्षा जास्त होती. पहाटे साडेतीन वाजता जम्मूहून हा ताफा निघाला आणि सूर्यास्ताआधी तो श्रीनगरला पोहोचणे अपेक्षित होते. श्रीनगर-जम्मू महामार्गावर अवंतीपुरा येथील लट्टूमोड येथे हा ताफा पोहोचला असताना स्फोटकांचा वापर करुन हा हल्ला घडवून आणला. जवानांच्या ताफ्यावर गोळीबारही झाला.