पालकांसमोरच उंदरांनी 6 महिन्याच्या बाळाचे तोडले लचके; हाताची बोटे अन् अंगठा केला गायब

Shocking News : आई वडील घरात असताना सहा महिन्यांच्या मुलाच्या शरीराचा भाग खाल्ल्याचा धक्कादायक प्रकार इंडियाना इथं समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुलाच्या आई वडिलांसह मावशीला अटक केली आहे.

आकाश नेटके | Updated: Sep 24, 2023, 12:49 PM IST
पालकांसमोरच उंदरांनी 6 महिन्याच्या बाळाचे तोडले लचके; हाताची बोटे अन् अंगठा केला गायब title=

Rats attack on boy : सहा महिन्याच्या उंदरांनी मुलाच्या शरीराचा भाग खाल्ल्याचा धक्कादायक प्रकार इंडियाना (indiana) इथं घडला आहे. या सगळ्या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे आई वडील घरी असतानाच उंदरांनी मुलाच्या शरीराचा भाग खाऊन टाकला आहे. मुलाच्या अंगावर 50 पेक्षा जास्त ठिकाणी उंदरांनी चावा घेतल्याचे आढळून आलं आहे. सहा महिन्यांच्या या चिमुकल्या बाळाच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा आहेत. 

एका पेक्षा जास्त उंदरांनी 6 महिन्यांच्या बाळाला चावून काढलं आहे. मुलगा त्याच्या पाळण्यात आरामात झोपलेला असताना हा सगळा प्रकार घडला. उंदरांनी मुलाच्या शरीराचा 50 पेक्षा जास्त वेळा चावा घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी बालक रक्ताच्या थारोळ्यात सापडल्याने पालकांना ही घटना कळली. हा सगळा प्रकार घडला त्यावेळी आई वडील झोपी गेले होते.

न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार ही घटना बुधवारी घडली. पीडित मुलाचे आई-वडील डेव्हिड आणि एंजल शोनाबॉम यांनी हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. मुलाच्या शरीरातून ठिकठिकाणाहून रक्त वाहत होतं. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनीही घटनास्थळ गाठून दोन्ही पालकांना ताब्यात घेतले. मुलाची योग्य काळजी न घेतल्याचा आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याच्या आरोपांखाली पोलिसांनीकडून कारवाई करण्यात आली. याच घरात राहणाऱ्या मावशी डेलानियालाही पोलिसांनी अटक केली आहे.

पोलीस तपासामध्ये मुलाच्या उजव्या हाताची चार बोटे आणि अंगठा गायब असल्याचे समोर आलं आहे. त्याच्या बोटांची केवळ हाडे दिसत होती. मुलाला रुग्णालयात नेले तेव्हा त्याच्या शरीराचे तापमान लक्षणीयरीत्या कमी झाले होते. त्याला रक्त चढवण्यात आले आहे. दिलासादायक बाब म्हणजे चिमुकल्याचा जीव वाचला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

पोलिसांनी घरात जाऊन तपासणी केली असता घरात केवळ कचरा आणि उंदराची विष्ठा सापडली आहे. मार्च महिन्यापासून उंदरांमुळे त्रास होत असल्याने कुटुंबियांनी काही उपाययोजना देखील केल्या होत्या. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. धक्कादायक बाब म्हणजे यापूर्वी अशाप्रकारच्या घटना घडल्या होत्या. या घरातील उंदरांनी इतर लहान मुलांनाही चावा घेतल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी पाहिलं आहे. घरातील दोन मुलांनी त्यांच्या शाळेतील शिक्षकांना उंदरांनी त्यांच्या पायाची बोटे खाल्ल्याचे सांगितले होते.

उंदरांची राजधानी न्यूयॉर्क

न्यूयॉर्क ही उंदरांची राजधानी म्हणून ओळखली जाते. या शहरात तीस दशलक्ष उंदीर असल्याचा अहवाल काही काळापूर्वी समोर आला होता. शहरात राहणाऱ्या प्रत्येक माणसामागे पाच उंदीर आहेत. मात्र आता नव्या आकडेवारीत त्यांची संख्या कमी झाली आहे. नवीन आकडेवारीनुसार या उंदरांची संख्या आता तीस लाख असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र आता एक नवीन समस्या समोर आली आहे. न्यूयॉर्कमध्ये दिसलेल्या काही उंदरांच्या आकाराने लोकांना आश्चर्यचकित केले. उंदरांचा आकार चार फुटांपेक्षा जास्त असल्याचे समोर आलं आहे.