रशियाच्या क्षेपणास्त्रं हल्ल्यात खारकीव्हमधील ऐतिहासिक इमारत उद्ध्वस्त

Russia Ukraine War : रशियाने केलेल्या हल्ल्यात युक्रेनच्या खारकीव्हमधील ऐतिहासिक इमारत उद्ध्वस्त झाली आहे. 

Updated: Mar 2, 2022, 08:31 PM IST
रशियाच्या क्षेपणास्त्रं हल्ल्यात खारकीव्हमधील ऐतिहासिक इमारत उद्ध्वस्त  title=

मास्को : Russia Ukraine War : रशियाने केलेल्या हल्ल्यात युक्रेनच्या खारकीव्हमधील ऐतिहासिक इमारत उद्ध्वस्त झाली आहे. सिटी काऊंसिल इमारतीवर रशियाने तुफानी बॉम्बहल्ला केला. त्यात ही इमारत नेस्तनाबूत झाली आहे. क्रुझ मिसाईलने रशियाने हे हल्ले केले आहेत. (Russia Ukraine Conflict) युक्रेनच्या खारकीव्हमध्ये रशियाने पुन्हा एकदा हल्ले वाढवले आहेत. 

रशियाने खारकीव्ह, युक्रेनमध्ये मोठा स्फोट झाला आहे. रशियाने सिटी कौन्सिल इमारतीवर क्षेपणास्त्रे डागली आणि इमारत जमीनदोस्त झाली. खारकीव्हवर एकापाठोपाठ एक मिसाईल टाकायला सुरूवात केली. रहिवासी भागात हल्ले केल्यानं घरांचं आणि वाहनांचं अतोनात नुकसान झाले आहे. युद्धाचा असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात एका रहिवासी इमारतीत उभ्या असलेल्या वाहनांवर मिसाईलने हल्ला झालाय. आकाशातून पाऊस पडावा तसे बॉम्बगोळे या वाहनांवर पडत आहेत. 

नाटो देशांना रशियाची धमकी

युक्रेनसोबत युद्ध सुरू असताना आता रशियानं नाटोलाही अंगावर घेण्याची तयारी सुरू केली आहे. नाटो देशांना कुठलेही परिणाम भोगावे लागू शकतात, अशा शब्दात रशियाने नाटोला धमकी दिली आहे. युद्ध सुरू झाल्यापासून नाटोनं युक्रेनला शस्त्रास्त्रं पुरवणं सुरू केलंय. त्यामध्ये मिसाईल, अँटी टँक शस्त्रास्त्रांचा समावेश आहे. 

युक्रेनला शस्त्र पुरवणार असल्याचं नाटोचे अध्यक्ष जेन्स स्टोलटर्नबर्ग यांनी स्पष्ट केलं होतं. नाटोच्या याच भूमिकेमुळे भविष्यात याचे परिणाम नाटो देशांना भोगावे लागू शकतात, असा थेट इशारा रशियाचे उपपरराष्ट्रमंत्री अलेक्झँडर ग्रुशको यांनी दिला आहे. 

पुन्हा एकदा अणुयुद्धाचं संकट गडद 

जगावर पुन्हा एकदा अणुयुद्धाचं संकट गडद झाल्याचं दिसतंय. कारण आक्रमक झालेल्या रशियानं पुन्हा अणुयुद्धाची धमकी दिलीय. तिसरं महायुद्ध हे अणुयुद्ध असेल आणि सर्वात विनाशकारी असल्याचं विधान रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी केलंय. त्यामुळे अणुबॉम्ब हल्ल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

रशिया युक्रेनला अण्वस्त्र मिळू देणार नाही असंही सर्गेईंनी स्पष्ट केलंय. युक्रेनवर हल्ला केल्यामुळे युरोपियन देशांनी रशियावर कडक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे रशिया आता चांगलाच आक्रमक झाला असून थेट अणू हल्ल्याचीच भाषा सुरू केलीय. तर आम्ही चर्चेच्या दुस-या फेरीसाठी तयार आहोत, पण धमक्या देऊ नका, असे युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्कींनी सुनावले आहे.