Russia Ukraine War: रशियायाने (Russia) केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर युक्रेनने (Ukraine) भारताकडे मदत मागितली आहे. युक्रेनच्या राजदूताने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. भारतातले युक्रेनचे राजदूत इगोर पोलिखा (Igor Polikha) म्हणाले की, भारत आणि रशियाचे संबंध चांगले आहेत. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती करतो की त्यांनी रशियाचे अध्यक्ष पुतिन आणि आमचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी त्वरित संपर्क साधावा.
रशियाने केवळ लष्करी तळांवर हल्ले होत असल्याचा दावा केला आहे. पण या हल्ल्यात युक्रेनमधल्या अनेक नागरिकांचाही मृत्यू झाला असल्याचं इगोर पोलिखा यांनी म्हटलं आहे. रशियाची पाच लढाऊ विमानं पाडल्याचा दावा युक्रेनने केला आहे. याशिवाय टँक आणि ट्रक उद्ध्वस्त केल्याचं युक्रेनने म्हटलं आहे.
मोदी हे जागतिक स्तरावर सर्वात शक्तिशाली आणि आदरणीय नेते आहेत. पुतीन इतर किती नेत्यांचं ऐकतील हे मला माहीत नाही. पण मोदींसोबत त्यांचे सौदार्हयाचे संबंध आहेत. त्यामुळे मोदी यात महत्त्वाची भूमिका बजावतील अशी आशा आहे, असं इगोर पोलिखा यांनी म्हटलं आहे.
भारत हा UN सुरक्षा परिषदेचा कायमस्वरूपी सदस्य आणि प्रभावी देश आहे. युक्रेन हा भारतासारखा लोकशाही देश असल्याचं राजदूत यांनी म्हटलं आहे.
रशिया युक्रेन वादावर भारताने तटस्थ भूमिका घेतली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून युद्धाबाबत तटस्थ असल्याचं सांगण्यात आलं आहे तसंच शांततापूर्ण तोडगा निघण्याची आशाही व्यक्त करण्यात आली आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या आपत्कालीन बैठकीत भारताने युक्रेनमध्ये शिकणाऱ्या आणि नोकरीनिमित्ताने राहणाऱ्या 20 हजार भारतीयांच्या सुरक्षेची काळजी असल्याचं सांगितलं आहे.
युक्रेनमधल्या भारतीयांसाठी सूचना
युक्रेनमधील बिघडलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताने युक्रेनमधल्या भारतीयांसाठी एक नवीन अॅडव्हायजरी जारी केली आहे. सध्या परिस्थिती वाईट आहे, तुम्ही जिथे आहात तिथेच थांबा, असे सांगण्यात आलं आहे. लोकांना त्यांच्या घरी, वसतिगृहात राहण्यास सांगितलं आहे. जे लोक युक्रेनची राजधानी कीव किंवा वेस्टर्न कीव्हच्या दिशेने गेले आहेत, त्यांनी आपल्या घरी परतावे, असंही सांगण्यात आलं आहे.