Ukraine War Russia On Pakistan: पाकिस्तानने रशियाविरुद्ध युद्ध सुरु असलेल्या युक्रेनला शस्त्र पुरवल्याच्या बातम्या समोर येत असतानाच आता रशियाने यावर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. भारतामधील रशियाच्या राजदूतांनी या संदर्भात बोलताना तीव्र संताप व्यक्त केला आहे. मॉस्कोचं यासंदर्भातील बातम्यांवर बारीक लक्ष आहे, असं रशियाचे भारतामधील राजदूत डेनिस अलीपोव यांनी सांगितलं आहे. मॉस्कोने पाकिस्तानकडून युक्रेनला मदत केली जात असल्याच्या वृत्तांना फार गांभीर्याने घेतलं आहे. अशा मदतीमुळे रशियाविरोधातील हलचाल आणि युद्धामधील परिस्थितीवर परिणाम होऊ शकतो म्हणून याकडे मॉस्को फार गांभीर्याने पाहत असल्याचंही अलीपोव म्हणाले.
"अशा बातम्या समोर आल्या आहेत. आम्ही ही माहिती फार गांभीर्याने हाताळत आहोत. अशा बातम्यांची खात्री पटली तर हा गोष्टींकडे आम्ही रशियाविरोधी भूमिका म्हणून पाहू आणि त्याकडे आम्हाला कानाडोळा करता येणार नाही. आम्ही वृत्तपत्रांमधील आणि अहवालांमधील माहिती फार गांभीर्याने घेत आहोत याचा मी पुन्हा उल्लेख करु इच्छितो. अशा मदतीमुळे युद्धामधील परिस्थितीवर मोठा परिणाम होत असल्याने त्या गांभीर्यानेच घेतल्या जातात," असं अलीपोव यांनी सांगितलं. आलीपोव यांनी आपल्या विधानामधून गरज पडल्यास आणि पाकिस्तानने युक्रेनला मदत केल्याचं सिद्ध झाल्यास पाकिस्तानविरुद्ध कारवाई करण्यासही व्लादिमीर पुतिन यांच्या नेतृत्वाखालील सरकार मागेपुढे पाहणार नाही असाच इशारा दिला आहे.
भारत आणि रशियाचे मागील अनेक दशकांपासून मैत्रीपूर्ण संबंध आहेत. मात्र पाकिस्तानही सध्या आधुनिक शस्त्र मिळवण्याच्या हेतूने रशियाबरोबर मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापिक करण्याचा प्रयत्न करत आहेत. रशिया आणि भारताने चीन तसेच पाकिस्तानपासून असलेला धोका लक्षात घेत नवी दिल्लीला एस-400 सहीत अनेक शस्त्रांसंदर्भातील करार यापूर्वीच केले आहेत.
विमानं, क्रूज आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांना नष्ट करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेली एस-400 ही एक विमानविरोधक प्रणाली आहे. यासंदर्भात बोलताना डेनिस अलीपोव यांनी, "एस-400 च्या डिलेव्हरीसंदर्भात बोलायचं झाल्यास ती प्रक्रिया सुरु आहे. यासंदर्भातील कंपन्यांच्या प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार दिलेल्या वेळात आणि भारतीय भागीदारांबरोबर असलेल्या पारंपारिक पूर्णनियोजित कार्यक्रमाप्रमाणेच डिलेव्हरी केली जाईल. पुढील वर्षाच्या शेवटपार्यंत ही प्रणाली भारताला सोपवली जाईल," असं म्हटलं आहे.
#WATCH | On reports of Pakistan sending arms to Ukraine, Russian Ambassador to India Denis Alipov says, "Yes, there have been reports and information about such instances, we take this information very seriously. Such examples, if confirmed, is a very explicit anti-Russia actions… pic.twitter.com/ycJbFnnDvo
— ANI (@ANI) August 28, 2023
अलीपोव यांनी रशिया आणि भारताचे संबंध अधिक सुदृढ होत असल्याचंही म्हटलं. "आकडेवारी दाखवते त्याप्रमाणे दोन्ही देशांमधील आर्थिक विकासामुळे आम्ही समादानी आहोत. दोन्ही देशांतील व्यापार वाढत आहे. आम्ही अर्थव्यवस्थेच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सहकार्य करत आहोत. आम्ही अर्थव्यवस्था, विज्ञान आणि उद्योगासंदर्भातील वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा करत आहोत. औण्विक ऊर्जा सहकार्याचा कार्यक्रमही यशस्वी ठरला आहे. आम्ही या क्षेत्रात काम करणारा भारताचा एकमेव मित्रदेश आहे," असंही अलीपोव म्हणाले.