जेरुसलेम : अमेरिकेनं आपला इस्त्रायलमधला दूतावास जेरुसलेमला हलवण्याचा निर्णय घेतलाय... याचे तीव्र पडसाद मुस्लिम जगतामध्ये उमटलेत.
खुद्द जेरुसलेममध्ये तणावाचं वातावरण आहे. पॅलेस्टाईनच्या निधर्मी आणि कट्टर मुस्लिम गटांनी अमेरिकेच्या धोरणाला विरोध करत आंदोलन तीव्र करण्याची हाक दिलीय. आज शुक्रवार असल्यामुळे नमाजावेळी मोठी गडबड होण्याची शक्यता गृहित धरून इस्त्रायलनं पोलिसांची कुमक मोठ्या प्रमाणात वाढवलीय.
इजिप्तची राजधानी कैरोमध्ये अल-अझार मशिदीबाहेर शेकडो नागरिकांनी अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात निदर्शनं केली. अमेरिका आणि इस्त्रायलचे झेंडे तसंच ट्रम्प यांचे पुतळे लोकांनी जाळले.
अमेरिकेचं मित्रराष्ट्र असलेल्या अफगाणिस्तानातही ट्रम्प यांच्या धोरणाविरोधात संतापाची भावना आहे. राजधानी काबुलमध्ये नागरिकांनी रस्त्यावर उतरून अमेरिकेविरोधात घोषणाबाजी केली. ट्रम्प आणि इस्त्रायल मुर्दाबादच्या घोषणा नागरिक देत होते.
तर बांगलादेशमध्येही अमेरिकेविरोधात निदर्शनं बघायला मिळाली. वेगवेगळ्या इस्लामी गटाचे सुमारे 3 हजार नागरिक या निदर्शनांमध्ये सहभागी झाले होते.
मलेशियाची राजधानी कौलालंपूरमध्ये हजारो नागरिकांनी अमेरिकेविरोधात निदर्शनं केली. या पार्श्वभूमीवर अमेरिकन वकिलातीबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली होती.
मुस्लिम आणि अरब जगतातून होणाऱ्या आक्रोशामध्ये इंडोनेशियाचे मुस्लिम नागरिकही सहभागी झाले. जकार्तामध्ये पॅलेस्टाईनचा झेंडा फडकवत अमेरिकेच्या धोरणाचा निषेध करण्यात आला.