Plane Crash : मॉस्कोला जाणारे विमान रविवारी अफगाणिस्तानमध्ये कोसळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे विमान अफगाणिस्तानमार्गे रशियाला जात होते. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अफगाणिस्तानच्या बदख्शान प्रांतात हा विमानाचा अपघात झाला आणि ते खाली कोसळलं. बदख्शान प्रांताच्या पोलीस कमांडने सांगितले की, विमान रात्री रडारवरून गायब झाले होते. यानंतर जिबाक जिल्ह्यातील डोंगराळ भागात ते कोसळले. विमानात किती प्रवासी होते याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
अफगाणिस्तानच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, मॉस्कोकडे निघालेले एक विमान अफगाणिस्तानच्या बदख्शान प्रांतातील वाखान भागात कोसळले आहे. बदख्शानमधील तालिबानच्या माहिती आणि संस्कृतीच्या प्रमुखाने या घटनेला दुजोरा दिला असून, प्रांतातील करण, मंजन आणि झिबाक जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या तोफखानेह पर्वतावर प्रवासी विमान खाली पडले.
अफगाणिस्तानच्या माध्यमांनी हे विमान भारतीय असल्याचा दावा केला होता. भारतीय विमान मंत्रालयाने हे विमान भारतीय नसल्याचे म्हटलं आहे. 'अफगानिस्तानमध्ये दुर्दैवी विमान अपघात झाला आहे. ते भारतीय विमान नाही आणि नॉन शेड्यू (एनएनएसओपी)/चार्टर विमान आहे. हे मोरक्कन अधिकृत छोटे विमान आहे. अधिक माहितीची वाट पाहत आहोत, असे भारतीय विमान मंत्रालयाने म्हटलं आहे.
दुपारी 12.45 वाजण्याच्या सुमारास अफगाणिस्तानच्या माध्यमांनी हे विमान भारताचे असून ते मॉस्कोला जात होते, अशी माहिती दिली होती. मात्र, अर्ध्या तासात पुन्हा ते प्रवासी विमान नसून भारतीय देखील नव्हते असे स्पष्ट करण्यात आलं. विमानात किती लोक होते आणि अपघातात बळी गेलेले लोक कोणत्या देशाचे होते हे अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान, या घटनेची चौकशी करण्यासाठी एक पथक परिसरात रवाना करण्यात आले आहे.