Maldives President Muizzu : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यावरुन गेल्या काही दिवसांपासून मालदीव आणि भारताचे संबंध ताणले गेले आहेत. पंतप्रधान मोदी लक्षद्वीपला गेल्यानंतर मालदीवच्या मंत्र्यांनी केलेल्या टीकेवरुन देशभरात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर मालदीवच्या पर्यटनावर बहिष्कार घालण्यास भारतीयांनी सुरुवात केली आहे. दुसरीकडे कोणालाही आमचा छळ करण्याचा परवाना दिलेला नाही, मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी म्हटलं होतं. आता या सगळ्या प्रकारात एका 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे.
मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू हे सध्या भारताला कडाडून विरोध करत आहेत. मात्र मुइज्जूच्या या विरोधाची किंमत मालदीवच्या जनतेला चुकवावी लागत आहे. अशातच मालदीवमधील एका 14 वर्षाच्या मुलाचा उपचाराअभावी मृत्यू झाला होता. या मुलाला ब्रेन ट्युमरचा त्रास असून बुधवारी रात्री त्याला पक्षाघात झाला होता. जेव्हा मुलाच्या वडिलांनी मालदीवच्या आयलँड एव्हिएशनकडे एअर अॅम्ब्युलन्सने मुलाला नेण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र यासाठी त्यांनी नकार दिला. कारण राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी घातलेल्या बंदीमुळे विमान उडू शकले नाही.
गेल्या अनेक वर्षांपासून मालदीवमध्ये भारतीय लष्कराची छोटी तुकडी तैनात आहे. मालदीवल्या मागील सरकारने केलेल्या विनंतीनंतर भारताने सागरी सुरक्षा आणि आपत्ती निवारणासाठी तिथे सैनिक तैनात केले होते. मात्र आता मालदीवचे नवे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी या सैनिकांना देश सोडण्यास सांगितले आहे. या सगळ्या दरम्यान, शनिवारी, मालदीवमध्ये एका 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. मुइज्जू यांनी मुलाच्या वडिलांना त्याला एअरलिफ्टसाठी करण्यासाठी भारताने दिलेले डॉर्नियर विमान वापरण्याची परवानगी नाकारली. त्यामुळे या मुलाचा वेदनादायक मृत्यू झाला. तात्काळ मुलाला हलवण्यास अधिकारी अपयशी ठरल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
पक्षाघाताचा झटका आल्यानंतर मुलाला लगेचच माले येथे घेऊन जाण्यासाठी आम्ही आयलँड एव्हिएशनला फोन केला. पण त्यांनी आमच्या फोनला प्रतिसाद दिला नाही. त्यांनी गुरुवारी सकाळी 8:30 वाजता फोन केला आणि सांगितले की अशा प्रकरणांसाठी फक्त एक एअर अॅम्ब्युलन्स वापरली जाऊ शकते. खूप विनंती केल्यानंतर 16 तासांनी मुलाला मालेकडे आणण्यात आले. मात्र तोपर्यंत मुलाचा मृत्यू झाला.
दरम्यान, मालदीवच्या लोकांना मदत करण्यासाठी भारताने दोन अॅडव्हान्स लाइट हेलिकॉप्टर, एक डॉर्नियर विमान आणि ऑफशोअर पेट्रोलिंग व्हेसल दिले आहे. यामध्ये हेलिकॉप्टर आणि विमानांचा वापर एअर अॅम्ब्युलन्स म्हणून केला जातो. पण मुइज्जू यांनी राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून त्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे मालदीव सरकारच्या आदेशाशिवाय ही विमाने आणि हेलिकॉप्टर उडू शकत नाहीत.