नवी दिल्ली : पाकिस्तानकडून वारंवार होणाऱ्या कुरघोड्या थांबण्याच नाव घेत नाहीत. दहशतवाद्यांना प्रोत्साहन देण असुदे किंवा सीमा रेषेचं उल्लंघन असे कारनामे करण्यात पाकिस्तान अग्रेसर आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधले तणावपूर्ण संबंध सुधारण्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत. यासाठी खुद्द पाकिस्तानतर्फेच पुढाकार घेण्यात आला आहे.
शांती चर्चा पुन्हा सुरू व्हावी यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलंय. भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांच्यात बैठक व्हावी यासाठी आग्रह धरलाय.
इम्रान खान यांच्या पत्रामुळे भारत आणि पाकिस्तानमधला शांती प्रस्ताव सुरू करण्याच्या दृष्टीनं टाकण्यात आलेलं हे पहिलं पाऊल आहे अशी चर्चा आता होतेय. भारत आणि पाकिस्तान यांच्यातली शांती चर्चा डिसेंबर २०१५ मध्ये सुरु झाली होती. पण पठाणकोटच्या दहशतवादी हल्ल्यानंतर ही चर्चा स्थगित करण्यात आलीय.