Pervez Musharraf Passes Away : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान जनरल परवेझ मुशर्रफ ( Former Pakistan President Pervez Musharraf) यांचे दुबईतील रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले आहे. मुशर्रफ हे पाकिस्तानच्या लष्कराचे माजी प्रमुख देखील होती. परवेझ मुशर्रफ हे बरेच दिवस आजारी होते. मुशर्रफ यांना हृदयविकारासह इतर व्याधी होत्या. परवेझ मुशर्रफ यांनीच 1999 मध्ये तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांना न सांगता भारताविरुद्ध कारगिल युद्ध सुरू केले होते.
मार्च 2016 मध्ये मुशर्रफ उपचारासाठी दुबईला गेले होते, तेव्हापासून त्यांच्यावर तिथे उपचार सुरू होते. याआधीही त्यांच्या मृत्यूच्या बातम्या आल्या होत्या, मात्र त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्याचे खंडन केले होते. प्रदीर्घ आजारपणात त्यांना अनेकदा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र यावेळी त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
मुशर्रफ यांना मिळाली होती फाशीचा शिक्षा
जनरल परवेझ मुशर्रफ यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच पेशावर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश वकार अहमद सेठ यांच्या अध्यक्षतेखालील विशेष न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने पाकिस्तानातील इतक्या मोठ्या पदावरील व्यक्तीला शिक्षा सुनावली होती.
परवेझ मुशर्रफ आणि कारगिल युद्ध
कारगिल युद्धाच्या वेळी जनरल परवेझ मुशर्रफ पाकिस्तानचे लष्करप्रमुख होते. कारगिलबाबत त्यांनी तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांना कोणतीही माहिती दिली नव्हती आणि युद्धाची सुरुवात केली होती. नवाझ शरीफ श्रीलंकेत असताना 12 ऑक्टोबर 1999 मध्ये मुशर्रफ यांनी लष्करी उठाव केला. नंतर त्यांनी स्वतःला पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष घोषित केले होते. त्याआधी श्रीलंकेतून येणाऱ्या मुशर्रफ यांच्या विमानाचे अपहरण करून दहशतवाद पसरवल्याचा आरोप केल्यानंतर नवाज शरीफ यांना अटक करण्यात आली होती. दुसरीकडे नवाझ शरीफ यांनी 1997 च्या सार्वत्रिक निवडणुकीत विजय मिळवत पंतप्रधानपदाची सूत्रे हातात घेतली होती. त्यावेळी नवाझ शरीफ यांनी जनरल परवेझ मुशर्रफ यांना लष्करप्रमुख केले होते. मात्र त्यांनीच स्वतःला राष्ट्राध्यक्ष घोषित करुन टाकले होते.