Omicron Update : ब्रिटनमध्ये Omicron व्हेरिएंटमुळे आलेली कोरोनाची लाट आता काहीशी ओसरताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत ब्रिटनमध्ये कोरोनाचे 94 हजार नवीन रुग्ण आढळून आले आहेत. 29 डिसेंबर रोजी आढळलेल्या कोरोनाच्या 2 लाख 46 हजार रुग्णांपेक्षा ही संख्या अडीच पट कमी आहे.
ब्रिटनमध्ये कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत सातत्याने घट होत आहे. अशा परिस्थितीत ब्रिटिश सरकारने आता लागू केलेले निर्बंध मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी याबाबत घोषणा केली आहे.
जॉन्सन यांनी संसदेत दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, 'ब्रिटनमध्ये 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 90 टक्क्यांहून अधिक लोकांना कोरोनाचा बूस्टर डोस देण्यात आला आहे. शास्त्रज्ञांच्या दाव्यानुसार ब्रिटनमध्ये ओमायक्रॉनची लाट येऊन गेली आहे. त्यामुळे आता निर्बंध हटवले जाणार आहेत.
कोणते निर्बंध हटवणार?
सरकारच्या घोषणेनुसार या निर्बंधांचा कालावधी 26 जानेवारीला संपणार आहे. म्हणजेच 27 जानेवारीपासून नागरिकांवर निर्बंध लागू होणार नाहीत. आता कोणत्याही कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना कोविड पासची गरज भासणार नाही. याशिवाय लोकांसाठी मास्क घालण्याचं बंधनही संपुष्टात येणार आहे. असं असलं तरी सध्या सार्वजनिक ठिकाणी मास्क अनिवार्य असणार आहे.
ओमायक्रॉन लाटेच्या दरम्यान, ब्रिटीश सरकारने कंपन्यांना कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा देण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र आता 27 जानेवारीपासून यासंबंधीची मार्गदर्शक तत्त्वेही मागे घेतली जाणार आहेत. म्हणजेच आता कर्मचाऱ्यांना आता कार्यालयात जाऊन काम करावं लागणार आहे. मात्र, एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं आढळल्यास, आयसोलेशनमध्ये जाण्याचा कायदेशीर नियम कायम राहील.