ना लस, ना उपचार, कोरोनाला रोखण्यासाठी ट्रम्प यांची भलतीच आयडिया!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यांना धक्का दिला आहे.

Updated: Jun 21, 2020, 08:31 PM IST
ना लस, ना उपचार, कोरोनाला रोखण्यासाठी ट्रम्प यांची भलतीच आयडिया! title=

तुलसा (ओक्लाहोमा) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यांना धक्का दिला आहे. ओक्लाहोमामध्ये निवडणूक प्रचाराच्या रॅलीमध्ये ट्रम्प यांनी कोरोना व्हायरसबाबत वक्तव्य करून नवी अडचण ओढवून घेतली आहे. आधीच ट्रम्प यांच्याविरुद्ध आफ्रिकी-अमेरिकन आणि आशियाई समुहाकडून वर्णद्वेषावरुन आंदोलनं होत आहेत. त्यातच त्यांनी पुन्हा एकदा चीनवर कोरोना व्हायरस पसरवण्याचा आरोप लावला. एवढच नाही तर त्यांनी कोरोना व्हायरसला 'कुंग फ्लू'ची उपमा दिली.

डोनाल्ड ट्रम्प कोरोना व्हायरसवरून वारंवार चीनला दोष देत आहेत, पण कुंग शब्दाचा उपयोग केल्यामुळे अमेरिकेतला आशियाई समूह नाराज होऊ शकतो, असं बोललं जातंय. 

एवढच नाही तर आपण अधिकाऱ्यांना कोरोना व्हायरसच्या चाचण्या धीम्या करायला सांगितल्याचं ट्रम्प म्हणाले. कोरोनाच्या चाचण्या म्हणजे दुधारी तलवार आहे, कारण जास्त चाचण्या केल्यास जास्त रुग्ण आढळत असल्याचं ट्रम्प यांना वाटतंय.

'जेव्हा तुम्ही जास्त चाचण्या करता, तेव्हा तुम्ही आणखी लोकांना शोधता, त्यामुळे जास्त रुग्ण सापडतात. म्हणून कोरोना चाचण्यांचा वेग कमी करायला मी आमच्या लोकांना सांगितलं आहे,' अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी दिली. अमेरिकेमध्ये आत्तापर्यंत २५ मिलियन म्हणजेच २.५ कोटी लोकांच्या कोरोना चाचण्या झाल्या आहेत. इतर देशांच्या तुलनेत हे आकडे खूप जास्त आहेत.

ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर व्हाईट हाऊसला स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे. डोनाल्ड ट्रम्प हे मस्करी करत होते, असं व्हाईट हाऊसकडून सांगण्यात आलं आहे.