ब्रिटनच्या राजमुकूटाचे वारसदार प्रिन्स चार्ल्स यांना कोरोनाची लागण

युरोपात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर राणी एलिझाबेथ द्वितीय यांना बकिंगहम पॅलेसमधून विंडसर कॅसल येथे हलवण्यात आले होते.

Updated: Mar 25, 2020, 04:46 PM IST
ब्रिटनच्या राजमुकूटाचे वारसदार प्रिन्स चार्ल्स यांना कोरोनाची लागण title=

लंडन: ब्रिटनच्या राजमुकूटाचे वारसदार प्रिन्स चार्ल्स यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. ब्रिटनमधील प्रसारमाध्यमांनी यासंदर्भातील वृत्त दिले आहे. त्यानुसार, प्रिन्स चार्ल्स यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून आली आहेत. मात्र, त्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर आहे. 

प्रिन्स चार्ल्स आणि त्यांची पत्नीने काही दिवसांपूर्वीच स्वत:ला स्कॉटलंड येथील घरात सेल्फ क्वारंटाईन केले होते. यानंतर दोघांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. मात्र, प्रिन्स चार्ल्स यांच्या पत्नीची कोरोना टेस्ट नेगेटिव्ह आली. काही दिवसांपूर्वीच प्रिन्स चार्ल्स यांचा सार्वजनिक कार्यक्रमातील एक व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. यावेळी प्रिन्स चार्ल्स यांनी लोकांशी हस्तांदोलन करणे टाळत  चक्क भारतीय पद्धतीच्या नमस्तेचा अवलंब केला होता. 

युरोपात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर राणी एलिझाबेथ द्वितीय यांना बकिंगहम पॅलेसमधून विंडसर कॅसल येथे हलवण्यात आले होते. त्याचवेळी बकिंगहम पॅलेसमधील एका अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे राजघराण्यातील इतर व्यक्तींनाही कोरोनाची लागण झाल्याचा संशय आहे. मात्र, बकिंगहम पॅलेसमध्ये जवळपास ५०० कर्मचारी आहेत. त्यामुळे प्रत्येक कर्मचारी राजघराण्यातील व्यक्तींच्या संपर्कात येतोच असे नाही. तरीही राजघराण्यातील सर्व व्यक्तींनी स्वत:चे विलगीकरण करून घेतले होते. मात्र, आता थेट प्रिन्स चार्ल्स यांनाच कोरोनाची लागण झाल्याने हा धोका आणखी वाढला आहे.