'त्याच्याऐवजी एखाद्या...', विराट इतकं टोचून यापूर्वी कोणीच बोललं नव्हतं; इरफानने दाखवला आरसा

Irfan Pathan Slams Virat Kohli: विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेमध्ये पूर्णपणे अपयशी ठरल्याचं दिसून आलं आहे. याच पार्श्वभूमीवर इरफानने काय म्हटलंय जाणून घ्या...

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 7, 2025, 07:42 AM IST
'त्याच्याऐवजी एखाद्या...', विराट इतकं टोचून यापूर्वी कोणीच बोललं नव्हतं; इरफानने दाखवला आरसा title=
विराटवर साधला निशाणा

Irfan Pathan Slams Virat Kohli: भारतीय संघातील सुपरस्टार कल्चर संपवण्याची मागणी करताना भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाणने विराट कोहलीला भारतीय संघात का ठेवण्यात आलं आहे? असा सवाल उपस्थित केला आहे. विराटने त्याच्या फलंदाजीमधील तांत्रिक चुका सुधारण्यासाठी घरगुती क्रिकेटची मदतही घेतली नसल्याचं पठाणने अधोरेखित केलं आहे. विराट फलंदाजीचं तंत्र सुधारण्यासाठी काही मेहनत घेत असल्याचंही दिसत नाहीये, असंही पठाण म्हणाला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या बॉर्डर-गावसकर चषक स्पर्धेमध्ये विराटबरोबरच कर्णधार रोहित शर्मालाही लय गवसली नाही. भारताच्या सुमार फलंदाजीमुळे भारताने ही मालिका 3-1 ने गमावली. या पराभवासहीत भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये जाण्याची संधीही गमावली आहे.

कठोर शब्दांमध्ये निशाणा

विराटच्या सुमार कामगिरीवरुन पठाणने कठोर शब्दांमध्ये निशाणा साधला. 'स्टार स्पोर्ट्स'शी बोलताना पठाणने, "सुपरस्टार कल्चर संपलं पाहिजे. टीम कल्चर म्हणजेच संघाला प्राधान्य देणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला तुमची कामगिरी सुधारली पाहिजे. या मालिकेआधी अनेक घरगुती क्रिकेट सामने पार पडले. तिथे तुम्हाला खेळण्याची आपला खेळ सुधारण्याची संधी होती. मात्र तुम्ही त्यात खेळला नाहीत. हे कल्चर बदलण्याची गरज आहे," असं पठाण म्हणाला. 

विराटऐवजी एखाद्या तरुण खेळाडूला...

सचिन तेंडुलकरही रणजीमध्ये खेळायचा. खरं तर सचिनला रणजी खेळण्याची काही गरज नव्हती. मात्र मैदानात चार ते पाच दिवस कसं उभं राहता येईल हे जाणून घेण्यासाठी तो रणजी खेळायचा, असं पठाणने म्हटलं आहे. "विराट कोहली घरगुती स्पर्धेमध्ये शेवटचा कधी खेळला होता तर एका दशकापूर्वी. पहिल्या डावामध्ये 2024 ला विराटची सरासरी 15 इतकी होती. मागील पाच वर्षांमध्ये त्याच्या धावांची सरासरी 30 सुद्धा नाही. असे वरिष्ठ खेळाडू भारतीय संघात हवेत का? याचा विचार व्हायला हवा. याऐवजी एखाद्या तरुण खेळाडूला वारंवार संधी दिली तर तो सुद्धा 25-30 ची सरासरी देईल," असं म्हणत पठाणने विराट संघात का आहे याबद्दल प्रश्न उपस्थित केला.

गावसकर इथे आहेत, त्यांच्याशी...

"विराट कोहलीने भारतासाठी बरंच काही केलं आहे. त्याने फार छान खेळी देशासाठी केल्यात मात्र तो आता एकच चूक वारंवार करुन बाद होतोय. तुम्ही ही तांत्रिक चूक सुधारण्याचा प्रयत्न करताना दिसत नाहीये. सनी सर (गावसकर) इथे आहेत. त्यांच्याशी किंवा इतर माजी क्रिकेटपटूंशी बोलण्यासाठी कितीसा वेळ लागतो?" असा सवाल पठाणने केला आहे. विराटने मागील 9 सामन्यांमध्ये 190 धावाच केल्या आहेत. विराट मागील अनेक सामन्यांमध्ये ऑफ स्टम्पच्या बाहेरुन जाणारा चेंडू खेळण्याच्या नादात बाद झाला आहे.