Torres Company Scam : मुंबईतून नुकताच एक मोठा घोटाळा समोर आला असून, अनेक गुंतवणुकदारांना यामुळं जबर हादरा बसला आहे. मीरा भाईंदर येथील एका कंपनीकडून हजारो गुंतवणुकदारांची कोट्यवधींची रक्कम लंपास झाल्याचं प्रकरण नुकतंच समोर आलं असून, शहरातील या फिल्मी स्टाईल घोटाळ्यानं सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली आहे.
टोरेस ज्वेलरी कंपनीवर सध्या गंभीर आरोप करण्यात येत असून, या कंपनीच्या मालकांच्या अडचणी आता वाढल्या आहेत. हजारो गुंतवणुकदारांचे पैसे घेऊन फरार झाल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. सोमलाकी मीरा भाईंदर येथील कंपनीची शाखा एकाएकी बंद झाल्यामुळं गुंतवणुकदारांनी थेट या कंपनीसमोरच ठिय्या मांडला.
कंपनीच्या कोणत्याही अधिकारी अथवा कर्मचाऱ्याशी संपर्क साधला जात नसतानाच एका महिला गुंतवणुकदारानं गोपनीयतेच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार वेबसाईटमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यानं गुंतलणुकदारांना त्यांचा परतावा दिला जात नाहीय असं कंपनीनं सांगितलं आहे. उपलब्ध माहितीनुार 2023 मध्ये नोंदणीकृत असणाऱ्या प्लॅटिनम हरेन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं 2024 मध्येच दादरमध्ये टोरेस ब्रँडअंतर्गत 30 हजार चौरस फुटांची आणखी एक शाखा सुरू केली. ज्यानंतर मीरा- भाईंदरमध्येही अनेक शाखा सुरू केल्या.
सदर कंपनीकडून सोनं, चांदी आणि मोइसॅनाईट (प्रयोगशाळेक तयार केले जाणारे हिरे) खरेदीवर तितक्याच रकमेवर कंपनीनं अनुक्रमे 48, 96 आणि 520 टक्के वार्षिक परतावा देण्याची हमी दिली जात होती. आश्चर्याची बाब म्हणजे दर आठवड्याला या परताव्याची रक्कम दिली जात होती. पण, मागील दोन आठवडे परतावा न मिळाल्यानं एकाएकी गुंतवणुकदारांमध्ये गोंधळ माजला.
कंपनीकडून सातत्यानं सोन्याचांदी ऐवजी मोइसॅनाईटमध्ये गुंतवणूक, खरेदी करण्यावर भर दिला जात होता, जिथं परताव्याचा आकडा मोठा (प्रति आठवडा 8 ते 11 टक्के) होता. कंपनीचं अधिकृत कार्यालय गिरवातील ओपेरा हाऊस इमारतीत असल्याचं सांगितलं जात असून, इमरान जावेद, सर्वेश सुर्वे आणि ओलेना स्टाइएन या तीन व्यक्ती कंपनीच्या संचालकपदी असल्याचं कळतं. या तिघांनीही आपला पत्ता कंपनीचाच पत्ता म्हणून दाखवला आहे.
एका प्रतिष्ठीत वृत्तसमुहाच्या माहितीनुसार तरुण शर्मा नावाच्या वकिलानं काही दिवसांपूर्वीच या योजनेसंदर्भातील तक्रार पोलिसात केली होती. त्यांच्या ओळखीतील अनेकांनीच या कंपनीमध्ये लाखोंची रक्कम गुंतवली होती. ही रक्कम 6 लाख, 9 लाख अशी असून, याबदल्यात दर आठवड्याला साधारण 48 हजार रुपयांचा परतावा दिला जात होता.
इथं कंपनीनं चांगला परतावा देत गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकला आणि रातोरात शाखा बंद केल्याचं कळताच गुंतवणूकदारांनी कंपनीबाहेर गर्दी केली. या घटनेची माहिती मिळताच एपीएमसी पोलीस, क्राईम ब्रांच आणि इतर पथकांनी सदर प्रकरणी तपास सुरू केला. सूत्रांच्या माहितीनुसार कंपनीचा मालक दुबईमध्ये असून, संपूर्ण नियोजनासह त्यांनं तिथं पळ काढला आणि रातोरात कंपनी बंद केली. सध्या कंपनीतील सर्व लोक फरार असून, सर्व दूरध्वनी क्रमांकही बंद आहेत. तेव्हा आता गुंतवणुकदारांच्या पैशांचं काय, तपासातून पुढे काय माहिती समोर येणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे.