Video: मच्छर अंडी घालताना कधी पाहिलंय का? कॅमेऱ्यात कैद झाला दुर्मिळ क्षण

Video Mosquito Laying Eggs: पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव झाल्याच पहायला मिळतं. मात्र सध्या सोशल मीडियावर डासांसंदर्भातील एक वेगळाच व्हिडीओ व्हायरल होत असून या व्हिडीओवर 2600 हून अधिक जणांनी कमेंट केली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 28, 2023, 04:18 PM IST
Video: मच्छर अंडी घालताना कधी पाहिलंय का? कॅमेऱ्यात कैद झाला दुर्मिळ क्षण title=
या व्हिडीओला लाखोंच्या संख्येनं लाईक्स आणि व्ह्यूज आहेत

Video Mosquito Laying Eggs: पावसाळ्यामध्ये मोठ्याप्रमाणात आजारांचा प्रादुर्भाव होतो. मान्सूनदरम्यान किड्यांचा आणि डासांचाही त्रास अधिक प्रमाणात जाणवतो. खरं तर डासांसाठी हा प्रजननाचा उत्तम काळ मानला जातो. त्यामुळेच या कालावधीमध्ये डासांची संख्या वाढल्याचं प्राकर्षाने जाणवतं. डेंग्यूचा प्रादुर्भाव ज्या डासांच्या प्रजातीच्या माध्यमातून होतो ते डास पाण्यावर अंडी घालतात आणि त्यामुळेच डेंग्यूच्या रुग्णांची संख्याही या कालावधीमध्ये वाढलेली दिसते. पावसाळ्यात डासांचा हा त्रास सर्वश्रृत असून अनेकजण या त्रासाला वैतागल्याचं पाहायला मिळतं.

विशेष फिचर वापरुन काढला व्हिडीओ

सध्या याच डासांसंदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये डासाची मादी अंडी देताना दिसत आहे. डासाची मादी ज्या पद्धतीने अंडी घालत आहे ते पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. खरं तर डास हे आकाराने फार छोटे असतात. त्यामुळे साध्या डोळ्यांनी डासांना अंडी देताना पाहता येत नाही. कॅमेराच्या माध्यमातून डासांची हलचाल कैद करण्यात आली तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. क्लोजअप फिचरच्या माध्यमातून शूट करण्यात आलेला हा व्हिडीओ समोर आला तेव्हा सारेच व्हिडीओ पाहून थक्क झाले.

मादी अनेक अंडी पानावर घालते

खरं तर डास कोणत्याच प्रकारे मानवासाठी उपयोगी ठरत नाहीत. डासांमुळे केवळ आजार पसरतात. त्यामुळे हा व्हिडीओ पाहून अनेकांनी डासांना अंडीच घालू देता कामा नये अशा अर्थाच्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. या व्हिडीओमध्ये डासाची मादी पांढऱ्या रंगाची अंडी देताना दिसत आहे. ही मादी अनेक अंडी पानावर घालताना दिसते. हा व्हिडीओ नॉर्मल स्पीडने पाहिला तर अधिक आश्चर्य वाटेल. हा व्हिडीओ आणि अंडी घालण्याचा डासाचा वेग पाहून अनेकांना असं तर यापूर्वी टाइपरायटरवर व्हायचं असं म्हटलं आहे.

2 हजार 660 हून अधिक कमेंटस

इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांनी कमेंट्स करुन व्हिडीओ फारच थक्क करणारा असल्याचं म्हटलं आहे. अंडी घातल्यानंतर ती लगेच नष्ट करा असं एकाने म्हटलं आहे. बऱ्याच जणांनी डासांची खरं तर काहीच गरज नाही असं म्हणत त्यांना मारुन टाकणेच अधिक योग्य ठरतं असं म्हटलं आहे. या व्हिडीओला 1 लाख 71 हजारांहून अधिक लाइक्स आहेत. तर 2 हजार 660 हून अधिक कमेंटस या पोस्टवर करण्यात आल्या आहेत.