Viral News : समुद्र... पाहताना जितका अथांग वाटतो तितकाच तो प्रत्यक्षात अथांग आहे ही वस्तुस्थिती. या पृथ्वीवर असणाऱ्या जलसाठ्यापैकी एक मोठा भाग समुद्र आणि महासागरांनी व्यापला आहे. अनेक शास्त्रज्ञ आणि अभ्यासकांच्या मते समुद्राच्या उदरात सृष्टीच्या निर्मितीची अनेक रहस्य दडली आहेत. याच रहस्यांची उकल करत असताना मानवी शरीर आणि समुद्राच्या तळाशी असणारा पाण्याचा नैसर्गिक दबाव यांच्या समीकरणासंदर्भातील एका प्रात्यक्षिकानं संपूर्ण जगाला भारावून सोडलं.
Joseph Dituri नावाच्या एका निवृत्त नौदल अधिकाऱ्याची या मोहिमेसाठी निवड करण्यात आली, ज्यांनी तीन महिन्यांहून अधिक काळ समुद्राच्या तळाशी काढला आणि मैलाचचा दगड ठरणारं एक निरीक्षण जगासमोर आलं. समुद्राच्या तळाशी असणाऱ्या एकंदर वातावरणाचा मानवी शरीरावर काय आणि कसा परिणाम होतो याचं परीक्षण करण्याच्या हेतूनं जोसेफ समुद्रात साधार 93 दिवसांसाठी राहिले आणि त्यांच्या या आगळ्यावेगळ्या मुक्कामानं त्यांचं वय तब्बल 10 वर्षांनी कमी झाल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला. अटलांटिक महासागरात करण्यात आलेल्या एका प्रयोगानंतर हे निरीक्षण समोर आलं.
समुद्रात मुक्कामी राहिल्यानंतर ज्यावेळी जोसेफ दितुरी यांना बाहेर काढण्यात आलं तेव्हा त्यांच्या क्रोमोसोमच्या शेवटी असणाऱ्या डीएनए कॅपचं आकुंचन झालं होतं, त्यांची लांबी 20 टक्क्यांनी वाढल्याची बाब लक्षात आली होती. याशिवाय त्यांच्या शरीरातील स्टेम सेलची संख्यासुद्धा वाढली होती. दितुरी यांच्या संपूर्ण शरीरात या उपक्रमादरम्यान सकारात्मक बदल होताना दिसले.
दितुरी यांनी स्वत:च्या शरीरातही काही बदल अनुभवले. ज्यामध्ये त्यांच्या झोपण्याच्या पद्धतीमध्ये सुधारणा होण्यासोबतच शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळीसुद्धा 72 अंकांनी घसरल्याचं लक्षात आलं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार समुद्राच्या पाण्याखाली असणाऱ्या दबावामुळं हे बदल दिसले असून, त्याचा शरीरावर सकात्मक परिणाम झाला होता.
या अनुभवानंतर खुद्द दितुरी यांनीसुद्धा आपल्या अनुभवाबाबत भारावणारी प्रतिक्राया देत संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं. 'तुम्हाला अशी जगापासून वेगळं करणारी एखादी कृती अतिशय गरजेची असते. इथं लोकांना दोन आठवड्यांच्या सुट्टीसाठी पाठवा जिथं त्यांचे पाय स्क्रब करून मिळतील, जिथं ते तणावमुक्त राहू शकतील आणि जिथं ते हायपरब्रिक मेडिसिनचा अनुभव घेऊ शकतील', असं दितुरी म्हणाले.
स्वत:च्या शरीरातील बदल अधोरेखित करत असतानाच आपलं मेटाबॉलिझम वाढल्याचं सांगत ज्या ठिकाणी आपण राहिले तिथं व्यायाम करण्यापासून इतर सुविधांमुळं हा प्रयोग यशस्वी ठरल्याचं ते म्हणाले. या प्रयोगाच्या निमित्तानं दितुरी यांनी स्वत:चाच विक्रम मोडित काढला. याआधी ते 73 दिवसांसाठी पाण्याखाली राहिले होते, यावेळी मात्र त्यांनी 93 दिवसांचा मुक्काम करत जगालाच आश्चर्यचकित केलं.