कोरोनाचे ब्रिटनवर संकट, पंतप्रधानानंतर कॅबिनेट मंत्री मायकल गोव्ह आयसोलेशनमध्ये

 ब्रिटनचे पंतप्रधान  जॉन्सन यांना कोरोनामुळे रुग्णालात दाखल केले असताना आता कॅबिनेट मंत्री मायकल गोव्ह हे देखील आयसोलेशनमध्ये गेलेत.  

Updated: Apr 8, 2020, 08:25 AM IST
कोरोनाचे ब्रिटनवर संकट, पंतप्रधानानंतर कॅबिनेट मंत्री मायकल गोव्ह आयसोलेशनमध्ये title=
Reuters photo

लंडन : एकीकडे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनामुळे रुग्णालात दाखल केले असताना आता दुसरीकडे ब्रिटनचे कॅबिनेट मंत्री मायकल गोव्ह हे देखील आयसोलेशनमध्ये गेलेत. त्यांच्या घरातील एका सदस्याला कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून गोव्ह यांनी स्वत:ला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सूचनेनुसार आता त्यांना स्वत:च्या घरातच वेगळे रहावे लागणार आहे. या दरम्यान ते घरुनच कार्यालयीन कामकाज करणार आहेत. 

ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसनं एकाच दिवसात सर्वाधिक ७८६ नागरिकांचा बळी घेतला आहे. मागील दोन दिवसांत ब्रिटनमध्ये मृतांच्या आकड्यात घट झाली होती. मात्र मंगळवारी मृतांचा आकडा पुन्हा वाढला. ब्रिटनच्या आरोग्य मंत्रालयालनं ही माहिती दिली आहे. 

 गेल्या आठवड्यात पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची कोरोना व्हायरसची चाचणी पॉझिटिव्ह आली. पण सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. म्हणून त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांना ऑक्सिजन लावण्यात आला आहे. तसेच बोरिस जॉन्सन यांच्या होणाऱ्या पत्नीला कोरोनाची लक्षणे असल्याचे सांगण्यात येत आहे. अद्याप सायमंड्स यांची कोरोना चाचणी करण्यात आलेली नाही. गेल्या एक आठवड्यापासून त्या आराम करत आहेत. 

 पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर पंतप्रधान पदाची संपूर्ण जबाबदारी परराष्ट्रमंत्री डोमनिक रॉब यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.  पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण झाल्याचे कळताच त्यांनी स्वत:ला आयसोलेशनमध्ये ठेवले. परंतु ५ एप्रिल रोजी संध्याकाळी त्यांना लंडनच्या सेंट थॉमस रुग्णालयात दाखल करण्यात आले.  त्यानंतर प्रकृतीत सुधारणा नसल्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.