कुलभूषण जाधव यांना पाकमध्ये न्याय मिळेल असे वाटत नाही, साळवे यांचा युक्तिवाद

कुलभूषण जाधव प्रकरणात आजपासून चार दिवस सलग सुनावणीला सुरुवात झाली.

Updated: Feb 18, 2019, 06:05 PM IST
कुलभूषण जाधव यांना पाकमध्ये न्याय मिळेल असे वाटत नाही, साळवे यांचा युक्तिवाद title=

द हेग - पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी भारतीय लष्करावर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयात सोमवारी सुनावणीला सुरुवात झाली. भारताकडून ज्येष्ठ वकील हरिष साळवे यांनी बाजू मांडली. पाकिस्तानमधील एकूण वातावरण बघता कुलभूषण जाधव यांना त्या देशात न्याय मिळेल, असे भारताला वाटत नाही, असा युक्तिवाद साळवे यांनी केला. कुलभूषण जाधव यांना भारतीय गुप्तहेर आणि दहशतवादी म्हणून पाकिस्तानकडून त्यांचा भारताविरोधात वापर करून घेण्यात येत आहे, असेही साळवे यांनी आपल्या युक्तिवादात सांगितले. दरम्यान, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे कामकाज मंगळवारपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. 

कुलभूषण जाधव प्रकरणात आजपासून चार दिवस सलग सुनावणीला सुरुवात झाली. पाकिस्तानात हेरगिरी केल्याच्या आरोपावरून तेथील लष्करी न्यायालयाने भारतीय नागरिक असलेल्या कुलभूषण जाधव यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. भारताने तातडीने या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयात आव्हान दिले. पाकिस्तानकडून कुलभूषण जाधव यांचे अपहरण करण्यात आले आहे. ते गुप्तहेर नाहीत, असा युक्तिवाद भारताचा आहे. कुलभूषण जाधव हे भारतीय नौदलातून निवृत्त झाले आहेत. 

एप्रिल २०१७ मध्ये पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना शिक्षा सुनावल्यानंतर लगेचच मे २०१७ मध्ये भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. त्यानंतर १८ मे २०१७ रोजी या खटल्याचा निकाल देत नाही, तोपर्यंत कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेची अंमलबजावणी करू नये, असे आदेश १० न्यायाधीशांच्या पीठाने पाकिस्तानला दिले. पाकिस्तानकडून व्हिएन्ना कराराचे उल्लंघन झाले आहे. भारताच्या उच्चायुक्तांना जाधव यांना भेटण्यास परवानगी दिली जात नाही, असेही भारताने न्यायालयात म्हटले आहे. कुलभूषण जाधव यांची तातडीने सुटका करावी, अशी मागणी भारताने न्यायालयात केली आहे.