राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प पराभूत होणार?

काय आहे अमेरिकेतील ओपिनियन पोलचा अंदाज?

Updated: Apr 30, 2020, 02:09 PM IST
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प पराभूत होणार? title=

ब्युरो रिपोर्ट :  अमेरिकेत कोरोनाचा कहर सुरु आहे आणि त्याचवेळी राष्ट्राध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकीची तयारीही सुरु आहे. विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार असतील. तर डेमोक्रेटिक पक्षातर्फे जो बिडेन अध्यक्षपदाचे उमेदवार असतील. वर्षअखेरीस होणाऱ्या या निवडणुकीची चर्चा जगभरात सुरु आहे.

अमेरिकेत सध्या कोरोनामुळे परिस्थिती गंभीर आहे. जगभरातले सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत आहेत आणि अमेरिकेत कोरोनामुळे सर्वाधिक बळी गेले आहेत. अमेरिकेत बेरोजगारांची संख्या आजवरची सर्वाधिक झाली आहे. अर्थव्यवस्था अडचणीत आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकन नागरिक अध्यक्षपदावर कुणाची वर्णी लावणार याची उत्सुकता जगभरात आहे. या आठवड्यात करण्यात आलेला ओपिनियन पोल त्यादृष्टीने महत्वाचा आहे.

ओपिनियन पोल कुणाच्या बाजुने?

याच आठवड्यात रॉयटर आणि इपसॉस (Reuters/Ipsos) यांनी केलेल्या ओपिनियन पोलनुसार डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा चार टक्के अधिक मतं घेऊन आघाडीवर आहेत. ४४ टक्के मतदारांनी बिडेन यांना पाठिंबा दर्शवला आहे. तर ४० टक्के मतदार ट्रम्प यांच्या बाजुने आहेत.

मिशिगन, विस्कॉन्सिन आणि पेनसिल्व्हेनिया या महत्वाच्या तीन राज्यांत  बिडेन यांना ओपिनियन पोलमध्ये आघाडी मिळाली आहे. तर ट्रम्प यांना २०१६ च्या निवडणुकीत ज्या राज्यांत यश मिळालं तेथे अजूनही पाठिंबा आहे.

ओपिनियन पोलवर ट्रम्प यांची काय आहे प्रतिक्रिया?

राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत बिडेन आघाडीवर असल्याचे ओपिनियन पोलमध्ये दिसून आले असले तरी विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र त्यांचा ओपिनियन पोलवर विश्वास नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. रॉयटरला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प म्हणाले की, त्यांचे प्रशासन कोरोना व्हायरसचं संकट कशापद्धतीने हाताळतं यावर अध्यक्षपदाच्या निवडणुकीचं जनमत असेल असं त्यांना वाटत नाही. माजी उपराष्ट्राध्यक्ष बिडेन आघाडीवर असल्याच्या ओपिनियन पोलच्या अंदाजावरच ट्रम्प यांनी आश्चर्य व्यक्त केलं.

ओपिनियन पोलबद्दल ट्रम्प म्हणाले, मी पोलवर विश्वास ठेवत नाही. अमेरिकेतील नागरिक हुशार आहेत यावर माझा विश्वास आहे. जो माणूस सक्षम नाही त्याला लोक निवडून देतील असे मला वाटत नाही.

बिडेन यांनी अमेरिकेचे सिनेटर म्हणून काही दशकं काम केलं आहे तर बराक ओबामा यांच्या काळात उपराष्ट्राध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे. बिडेन यांच्या या कारकिर्दीवर ट्रम्प यांनी टीका केली आहे. ट्रम्प म्हणाले, सध्या जी परिस्थिती उद्भवली आहे म्हणून मी त्यांना सक्षम नाहीत असं म्हणत नाही. तर त्यांची ३० वर्षांची कारकिर्दच निष्क्रिय आहे. त्यांनी जे-जे केलंय ते वाईटच होतं. त्यांचं परराष्ट्र धोरण तर मोठी आपत्ती होती.

कोरोना व्हायरसचं संकट हाताळण्यावरून ट्रम्प यांच्यावर बिडेन यांनी टीका केली आहे. पण ट्रम्प म्हणतात, ही निवडणूक कोरोना  व्हायरस हाताळणी कशी केली यावरच जनमत नाही तर ते आम्ही केलेल्या अनेक कामांवरचं जनमत असेल. आणि आम्ही निश्चितपणे चांगली कामगिरी केली आहे.

बिडेन यांच्याबरोबर समोरासमोर चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

बिडेन यांच्याकडून पराभव पत्करावा लागण्याची लागेल असा अंदाज असलेले ओपिनियन पोलचे आकडे ट्रम्प यांना दाखवण्यात आले तेव्हा त्यांनी त्यांचे प्रचार व्यवस्थापक ब्रॅड पार्स्केल यांना जाब विचारल्याचं कळतं. एप्रिलमध्ये झालेल्या ओपिनियन पोलमध्ये ट्रम्प यांच्याविरोधात जनमत असल्याचं दिसून आलं आहे. अर्थात ट्रम्प यांनी मात्र पार्क्सेल यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे.

आपल्या प्रचार व्यवस्थापकाबाबत ट्रम्प म्हणाले, ते चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. मी त्यांच्यावर कधीही रागावलेलो नाही आणि तसं करण्याचा उद्देशही नाही. माझ्याबरोबर ते अनेक वर्षे आहेत, अगदी २०१६च्या निवडणुकीतील विजयातही ते माझ्याबरोबर होते.

 

अमेरिकेत दर चार वर्षांनी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होते. यावर्षी ३ नोव्हेंबर रोजी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.