इराणमध्ये पुन्हा एकदा Moral Policing, हिजाब न घालणाऱ्या महिलांविरोधात कारवाई; लाथ मारुन गाडीत बसवलं

Iran Hijab: इराणमध्ये (Iran) पुन्हा एकदा महिलांना हिजाबची (Hijab) सक्ती केली जात आहे. जवळपास 10 महिन्यांनी पुन्हा एकदा इराणच्या रस्त्यांवर मोरॅलिटी पोलीस (Morality Police) उतरले आहेत. गतवर्षी सप्टेंबर महिन्यात हिजाबला विरोध दर्शवत आंदोलन केलं जात असताना महसा अमिनीचा मृत्यू झाल्यानंतर मोरॅलिटी पोलिसांना हटवण्यात आलं होतं.   

शिवराज यादव | Updated: Jul 17, 2023, 11:03 AM IST
इराणमध्ये पुन्हा एकदा Moral Policing, हिजाब न घालणाऱ्या महिलांविरोधात कारवाई; लाथ मारुन गाडीत बसवलं title=

Iran Hijab: इराणमध्ये (Iran) पुन्हा एकदा महिलांना हिजाबची (Hijab) सक्ती केली जात आहे. जवळपास 10 महिन्यांनी पुन्हा एकदा इराणच्या रस्त्यांवर मोरॅलिटी पोलीस (Morality Police) उतरले आहेत. गतवर्षी सप्टेंबर महिन्यात हिजाबला विरोध दर्शवत आंदोलन केलं जात असताना महसा अमिनीचा मृत्यू झाल्यानंतर मोरॅलिटी पोलिसांना हटवण्यात आलं होतं. हा विभाग बरखास्त करण्यात आल्याचंही बोललं जात होतं. 

दरम्यान, रविवारी जनरल सईद मुंतजिर उल महदी यांनी सांगितलं की, मोरॅलिटी पोलीस विना हिजाब महिलांची धरपकड करत आहेत. महसा अमिनीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यानतर इराणमध्ये आंदोलन पेटलं होतं. मात्र हे आंदोलन नंतर चिरडण्यात आलं होतं. यावेळी एकूण 500 आंदोनलकर्त्यांचा मृत्यू झाला होता. 

महिलांवर नजर ठेवण्यासाठी गाड्यांमधून गस्त

या महिन्याच्या सुरुवातीपासूनच अधिकाऱ्यांनी मनोरंजनाच्या ठिकाणांवर नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. तसंच आपल्या परिसरात हिजाबचे नियम लागू करण्यात असमर्थ ठरलेल्या डझनभर कॅफे, रेस्तराँ आणि इतर उद्योगांना बंद करण्यात आलं आहे. 

इराणमध्ये मोरॅलिटी पोलीस गाड्यांमधून सार्वजनिक ठिकाणी गस्त घालणार आहे. जेणेकरुन हिजाब न घालणाऱ्या महिलांवर नजर ठेवता येईल. रविवारपासून याची सुरुवात करण्यात आली आहे. इराणमधील महिला सामाजिक कार्यकर्त्या मासिह अलिनेजद यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये मोरॅलिटी पोलीस दलातील एक महिला अल्पवयीन मुलीला पकडताना दिसत आहे. यावेळी मुलीने हिजाब घातलेला नाही. 

महिलेला घातली लाथ

मोरॅलिटी पोलीस परतल्यानंतर सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ शेअर केले जात आहे. साराह रावियानी नावाच्या आणखी एका महिला सामाजिक कार्यकर्त्यानेही मोरॅलिटी पोलिसिंगचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये काही लोक महिलेला जबरदस्ती गाडीत बसवताना दिसत आहेत. महिलेने विरोध केला असता तिला लाथ घालण्यात आली. 

अलजजीराने दिलेल्या वृत्तानुसार, मोरॅलिटी पोलीस फक्त महिलाच नाही तर पुरुषांच्या कपड्यांवरही नजर ठेवणार आहे. आधी लोकांना चेतावणी दिली जाणार आहे. यानंतर जर नियमांचं पालन केलं नाही तर त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल. 

हिजाब न घातल्यास 49 लाखांचा दंड, पासपोर्टही होणार जप्त

इराणच्या संसेदत महिलांच्या ड्रेसकोडसंबंधी एक नवा कायदा तयार करण्यात आला आहे. या कायद्यांतर्गत ज्या महिला हिजाब घालणार नाहीत त्यांना 49 लाखांपर्यंतचा दंड ठोठावला जाऊ शकतो. इराणचे खासदार हुसैन जलाली यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. इतकंच नाही तर संबंधित महिलांचा पासपोर्ट जप्त केला जाणार आहे. याशिवाय त्यांच्या इंटरनेट वापरावर बंदी असेल.