नवी दिल्ली : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही काळापासून सतत एच-वन बी व्हिजासाठी असणारे नियम अधिक कडक करण्याच्या प्रयत्नात आहेत... आता त्यांनी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्याचं पक्क केलंय. ट्रम्प सरकार एच-वन बी व्हिजा धारकाच्या पती/पत्नीसाठी अमेरिकेत कायदेशीररित्या काम करण्यासाठी बंदी आणण्याची तयारी करत आहेत. या निर्णयाचा सर्वात जास्त परिणाम भारतीयांवर होण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या संघीय एजन्सीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं लॉ मेकर्सला ही माहिती दिलीय. या नियमांचा सरळ सरळ परिणाम 70 हजारांहून अधिक एच-4 व्हिजा होल्डरवर होणार आहे, ज्यांना इथं वर्क परमिट मिळालंय.
एच-4 व्हिजा, एच-1 बी व्हिजा होल्डर्सच्या पती अथवा पत्नीला दिला जातो. एच-1 बी व्हिजा घेऊन अमेरिकेत काम करण्यासाठी दाखल झालेल्या व्यक्तींच्या जोडीदाराला हा व्हिजा दिला जातो. यामध्ये सर्वात जास्त संख्या भारतीय दाम्पत्याची आहे. ओबामा प्रशासनानं लागू केलेला हा नियम ट्रम्प प्रशासन बदलण्याच्या तयारीत आहे.
भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या हाय - स्किल्ड प्रोफेशनल्सची यात मोठी संख्या आहे. त्यांना ओबामा सरकारद्वारे एक स्पेशल ऑर्डर अंतर्गत वर्क परमिट मिळत होतं. या नियमाचा भारतीय - अमेरिकन व्यक्तींना चांगलाच फायदा झाला होता. या नियमाचा जवळपास 1 लाखांहून अधिक एच-4 व्हिजा होल्डर्सना फायदा झाला होता.