किम जाँग उन यांच्या तब्येतीबाबत डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया

किम जॉंग उन यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांची तब्येत अतिशय नाजूक झाल्याची माहिती मिळत आहे.

Updated: Apr 22, 2020, 10:35 AM IST
किम जाँग उन यांच्या तब्येतीबाबत डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया title=
संग्रहित फोटो

वॉशिंग्टन : उत्तर कोरियाई नेते किम जाँग उन यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांची तब्येत अतिशय नाजूक झाल्याची माहिती मिळत आहे. ही जगभरातील मीडियात ही मोठी चर्चेची गोष्ट ठरत आहे. यादरम्यान, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी किम जाँग उन यांच्या तब्येतीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ट्रम्प यांनी मंगळवारी किम जाँग उन यांच्या चांगल्या स्वास्थासाठी प्रार्थना केली. 

व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना, किम जाँग उन यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत. त्यामुळे मी केवळ त्यांच्या चांगल्या तब्येतीसाठी, चांगल्या स्वास्थासाठी प्रार्थना करु शकतो. मला आशा आहे की ते लवकर बरे होतील, असं ते म्हणाले. किम जाँग उन यांची तब्येत कशी आहे ते पाहण्यासाठी, ट्रम्प कदाचित त्यांना भेटण्यासाठीही जाऊ शकतात असंही ते म्हणाले. 

ट्रम्प यांनी, किंम जाँग उन यांच्याबाबत कोणतीही प्रत्यक्ष माहिती नसून केवळ बातम्यांमधून मिळालेली माहितीच माहित असल्याचं त्यांनी सांगितलं.

दक्षिण कोरियाच्या ऑनलाईन मीडिया आउटलेट डेली एनके यांनी दिलेल्या माहितीनुसार, किम यांच्यावर या महिन्याच्या सुरुवातीला एक कार्डियोवास्कुलर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या मीडियाने देशातील एका अज्ञात स्रोताचा हवाला देत, अधिक धुम्रपान, लठ्ठपणा आणि थकवा या कारणांमुळे किम यांच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.