वॉशिंग्टन : अमेरिकेत काम करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या एच वन बी व्हिसासाठीचे नियम अधिक काटेकोर करण्याचा निर्णय डोनाल्ड ट्रम्प प्रशासनानं घेतलाय. याचा मोठा फटका भारतीय कंपन्यांना बसण्याची शक्यता आहे.
अमेरिकेत असणाऱ्या कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी अमेरिकेबाहेरून मनुष्यबळ आणण्याची गरज असेल, तर त्या व्यक्तीला एच वन बी व्हिसा घ्यावा लागतो. आतापर्यंत तीन वर्षांच्या कालावधीसाठी हा व्हिसा मिळायचा. मात्र आता जेवढ्या कालावधीसाठी त्या व्यक्तीला काम असेल, तेवढ्याच कालावधीसाठी हा व्हिसा देण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासन घेणार आहे.
अमेरिकेच्या बाहेरून मनुष्यबळ आयात करणाऱ्या कंपनीलादेखील आता ज्या पदावर कर्मचाऱ्याला रुजू करायचे, त्याचे तपशील प्रशासनाकडं द्यावे लागणार आहेत. शिवाय किती कालावधीसाठी त्या व्यक्तीसोबत करार केला जाईल, त्या व्यक्तीचं पद, पगार वगैरे बाबीदेखील अगोदरच स्पष्ट करावे लागतील.