कोलंबिया : कोलंबियाच्या न्यायालयाने बुधवारी एक मोठा निर्णय दिला. या निर्णयाअंतर्गत कोलंबियाने गंभीर वैद्यकीय प्रकरणांमध्ये आत्महत्येचं समर्थन केले आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींना आत्महत्येसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांना परवानगी दिली आहे. तिथल्या वकिलांनी सांगितलं की, कोलंबिया आता हा नियम लागू करणारा लॅटिन अमेरिकेतील पहिला देश बनला आहे.
कोलंबियामध्ये 1997 सालपासून इच्छा मृत्यु कायदेशीररित्या वैध आहे. असाध्य आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीने या वर्षी जानेवारीमध्ये पहिल्यांदा याचा वापर केला होता.
जेव्हा एखादी व्यक्ती डॉक्टरांशी सल्लामसलत केल्यानंतर जीवन संपवण्याचं पाऊल उचलते तेव्हा त्याला सहाय्यक आत्महत्या म्हणून वर्गीकृत केलं जाईल. कोलंबियन राईट-टू-डाय ग्रुप DescLAB ने खटला दाखल केल्यानंतर या मुद्द्यावर निर्णय घेण्यात आला आहे.
या संस्थेकडून असा युक्तिवाद करण्यात आलाय की, जेव्हा एखादा वैद्यकीय कर्मचारी दुसर्या व्यक्तीला एका विशिष्ठ परिस्थितीत त्याचं जीवन संपवण्यासाठी मदत करतो तेव्हा त्याला किंवा तिला शिक्षा मिळणार नाही.
आतापर्यंत, कोलंबियामध्ये ज्या व्यक्ती गंभीर आजाराने ग्रस्त लोकांना आत्महत्या करण्यास मदत करत होते त्यांना 16 ते 36 महिने तुरुंगवासाची शिक्षा होत होती. DescLAB म्हणण्याप्रमाणे, 2010 ते गेल्या वर्षीच्या ऑगस्टपर्यंतच्या अशा 127 प्रकरणांची चौकशी करण्यात आली आहे.
कोलंबिया व्यतिरिक्त, स्वित्झर्लंड, नेदरलँड, लक्झेंबर्ग, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, स्पेन, जर्मनी आणि युनायटेड स्टेट्समधील काही राज्यांनी अशा परिस्थितीत वैद्यकीय सहाय्याने आत्महत्या करण्यास परवानगी दिली आहे.