कोरोनाचं थैमान, चीन परेशान, वाढत्या रूग्णसंख्येचा हाहाकार

चीनमध्ये वाऱ्याच्या वेगानं कोरोना (Corona in China) पसरू लागला आहे. चीनमधील स्थिती दिवसेंदिवस बिकट बनत चालली आहे.

Updated: Mar 19, 2022, 08:35 PM IST
कोरोनाचं थैमान, चीन परेशान, वाढत्या रूग्णसंख्येचा हाहाकार title=
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई : चीनमध्ये वाऱ्याच्या वेगानं कोरोना (Corona in China) पसरू लागला आहे. चीनमधील स्थिती दिवसेंदिवस बिकट बनत चालली आहे. त्यात आता कोरोना रूग्णांच्या मृत्यूनं चीनसमोर नवं संकट उभं राहिलं आहे. (corona condition is critical in china)

ज्या चीनमधून कोरोना साऱ्या जगभर पसरला तिथंच कोरोनाचा नवा व्हेरियंट हातपाय पसरू लागलाय. चीनमध्ये 2020 सालात जी स्थिती होती अगदी तशीच स्थिती पाहायला मिळतेय. त्यातच वर्षभरानंतर पहिल्यांदाच दोन रूग्णांचा मृत्यू झाल्यानं चीनमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

कोरोनाचं थैमान, चीन परेशान

चीनमध्ये कोरोना रूग्णांची संख्या 4 हजार 638 इतकी झाली आहे. विशेष म्हणजे शनिवारी एका दिवसात तब्बल 2 हजार 157 लोक संक्रमित झाल्याचं आढळून आलंय. खबरदारीचा उपाय म्हणून चीनच्या पुर्वेकडील शहरांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे. तर शांघायमधील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

बीजिंगमध्ये येणाऱ्या लोकांना न्यूक्लिक अॅसिड टेस्ट बंधनकारक करण्यात आलीय. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी एकत्रित येण्यास, एकत्र जेवण करण्यास आणि सभा-समारंभात गर्दी करण्यास मनाई करण्यात आलीय.

चीनमध्ये डेल्टॉक्रॉननं अक्षरश: थैमान घातलंय. लोकांमध्ये कोरोनाची दहशत पाहायला मिळतेय. हाँगकाँगमधील स्थिती याहून बिकट आहे. 

डेल्टाक्रॉननं टेंशन वाढवलं

डेल्टाक्रॉन व्हेरियंट हा डेल्टा आणि ओमियक्रॉनपासून तयार झालाय. हा व्हेरियंट दुप्पट वेगानं पसरतोय. विशेष म्हणजे याआधी एका व्यक्तीला एकाच व्हेरियंटचं संक्रमण होत होतं. मात्र नव्या व्हेरिटंयमुळे अनेकांना एकाचवेळी डेल्टा आणि ओमायक्रॉनची बाधा झाल्याचं दिसतंय. 

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी चिनी प्रशासनानं कडक पावलं उचलली आहेत. मात्र तिथं कोरोना रूग्णांची संख्या झपाट्यानं वाढतेय. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन भारतानं चौथी लाट  रोखण्यासाठी आतापासूनच तयारी करायला हवी आणि नागरिकांनीही खबरदारी घेण्याची गरज आहे.