मुंबई : जगभरात नेहमी आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करणारा चीन सध्या कोरोना व्हायरसच्या विळख्यात सापडला आहे. कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये लोकांच्या मृत्यूंची संख्या रोज वाढत आहे. चीनच्या तिजोरीवर मोठा ताण पडू लागला आहे. चीनच्या आर्थिक स्थितीवर याचा परिणाम होत आहे. कोरोना व्हायरसचं तांडव थांबवण्याचं नाव घेत नाही आहे. जगभरातील देशांनी याचा धसका घेतला असून अनेक देशांनी चीनमधून येणाऱ्या विमान सेवा रद्द केल्या आहेत. काही देशांमध्ये अशा प्रवाशांची विमानतळावरच चाचणी केली जात आहे.
कोरोना व्हायरसमुळे चीन आर्थिक संकटात सापडला आहे. चीनमध्ये 30 हजाराहून अधिक जण या व्हायरसच्या कचाट्यात सापडले आहे. गेल्या एक महिन्यात चीनमध्ये मोठ्या प्रमाणात या व्हायरसपासून निपटण्यासाठी खर्च सुरु आहे. चीनची अर्थव्यवस्था ही गेल्या 30 वर्षातील सर्वात नाजूक परिस्थितीतून जात आहे.
कोरोना व्हायरस (Corona virus)ने चीनच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का लावला आहे. आधीच ट्रेड वॉर आणि आता कोरोना व्हायरस वरील खर्च यामुळे चीनला मोठा फटका बसत आहे. कंपन्यांच्या नफ्यात सर्वात मोठी घट झाली आहे. 1 महिन्यात चीनचं शेअर मार्केट खाली गेलं आहे. गुंतवणूकदारांचे 420 बिलियन डॉलर म्हणजेच 30 लाख कोटी बुडाले आहेत.
चीनसाठी या वर्षाची सुरुवात वाईट ठरत आहे. चीनमधील शेअर बाजारामध्ये 9 टक्क्यांची घट झाली आहे. चीनच्या कंपन्या आर्थिक अडचणीत आल्या आहेत. चीन भविष्यात आणखी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. कोरोना व्हायरसमुळे चीनची कंबर मोडणार आहे. अनेक बाहेरच्या कंपन्यांनी चीनमधील प्लांट बंद केले आहेत. परिस्थिती सामान्य होईपर्यंत हा निर्णय घेण्यात आला आहे.
भारताने देखील चीनमध्ये जाणारी विमानसेवा सध्या बंद ठेवली आहे. चीनसोबत व्यापार करणाऱ्या अनेक देशांनी गेल्या 15 दिवसात व्यापार बंद ठेवला आहे.
चीन सरकारच्या पुढच्या रणनीतीकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. कोरोना व्हायरसपासून सरकार कशा प्रकारे दोन हात करणार याबाबत जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे.