कराची : कराची येथील पाकिस्तान स्टॉक एक्सचेंजवरील हल्ल्याची जबाबदारी बलूचिस्तान लिबरेशन आर्मीने घेतली आहे. बलूचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) च्या माजिद बिग्रेडने हा हल्ला केला. त्यांचं म्हणणं आहे की, हे सर्व हल्लेखोर सुसाइड बॉम्बर होते. कराची पोलीस आणि रेंजर्सने चारही दहशतवाद्यांना मारलं आहे.
सोमवारी कराचीच्या पाकिस्तान स्टॉक एक्सचेंजवर दहशतवादी हल्ला झाला. पार्किंग क्षेत्रात चार दहशतवाद्यांनी गोळीबार केला आणि मुख्य गेटवर ग्रेनेड हल्ला केला. यादरम्यान सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. काही काळानंतर उर्वरित दोन दहशतवाद्यांनाही कराची पोलीस आणि पाकिस्तानी रेंजर्सने गोळ्या घालून ठार केले.
मात्र, दहशतवाद्यांच्या गोळीबारात 6 जण ठार झाल्याची माहिती आहे. यात चार गार्ड आणि एक पोलीस यांचा समावेश आहे. कराची पोलिसांनी संपूर्ण इमारत रिकामी केली असून आजूबाजूच्या परिसरात शोध मोहीम सुरू आहे. पाकिस्तानी पोलिसांनी जवळच्या रेल्वे कॉलनीत शोधमोहीम राबविली आहे.
सिंध प्रांताची राजधानी कराची येथे झालेला दहशतवादी हल्ला ही एक मोठी घटना आहे, कारण त्याला पाकिस्तानची आर्थिक राजधानी देखील म्हटले जाते. कराची पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असून कार मालकाचा शोध घेण्यात येत आहे. दरम्यान, बलूचिस्तान लिबरेशन आर्मीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
अलीकडच्या काळात बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने पाकिस्तानमध्ये अनेक दहशतवादी हल्ले केले आहेत. ही दहशतवादी संघटना पाकिस्तानमधून बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढा देत आहे. ही दहशतवादी संघटना २००० साली तेव्हा चर्चेत आली जेव्हा त्यांनी पाकिस्तानमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले होते.