मुंबई : चिनी ड्रॅगनच्या भारताविरोधात कुरापती सुरूच आहेत. आता हिंद महासागरात अंडर वॉटर ड्रोनची फौज उतरवलीय. भारताविरोधी हेरगिरीसाठी या अंडर वॉटर ड्रोनचा वापर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. लडाखमध्ये भारतीय भूमीवर अतिक्रमणाचा कुटील डाव रचणाऱ्या चीनला सर्वच पातळ्यांवर सडेतोड उत्तर देण्याची तयारी भारतानं केली आहे. पण कुरापती चिनी ड्रॅगन काही केल्या ऐकायला तयार नाही.
आता भारताविरोधात चिनीनं हिंद महासागरात कुरापती सुरू केल्यात. चिननं अंडरवॉटर ड्रोनची फौजच तैनात केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सी विंग ग्लायडर्स नावानं ओळखले जाणारे ड्रोन्स समुद्रात तैनात असल्याचा दावा संरक्षण तज्ज्ञ एच. आय. सटन यांनी सादर कलेल्या अहवालात करण्यात आला आहे.
हेरगिरी करण्यासाठी या अंडर वॉटर ड्रोन्सचा वापर केला जातो. चीननं मोठ्या प्रमाणात हे ग्लायडर्स तैनात करण्यात आलेत. हे ग्लायडर्स युव्हीव्ही प्रकारातले आहेत. डिसेंबर 2019मध्ये अंडर वॉटर ड्रोन तैनात करण्यात आले होते. मोठ्या विंग्जच्या सहाय्यानं ते समुद्रात खोलपर्यंत जाऊ शकतात. पण अंडर वॉटर ड्रोन खूप वेगवान नसतात. पण एखाद्या मिशनवर ते दीर्घकाळ तैनात राहू शकतात.
चीनचे हे अंडरवॉटर ड्रोन्स अमेरिकेच्या अंडरवॉटर ड्रोनची कॉपी असल्याचं सांगण्यात येत आहे. 2016मध्ये अमेरिकन ड्रोनपैकी एक ड्रोन चीननं जप्त केलं होतं. त्याचीच ही कॉपी असल्याचं सांगण्यात येतं आहे. हे अंडर वॉटर ड्रोन समुद्रातील जैवविविधतेच्या संशोधनासाठी असल्याचा दावा चिनी सरकारनं केला आहे. पण चीनच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन चालणार नाही. चीननं समुद्रात कोणतीही आगळीक केल्यास त्यांना सडेतोड उत्तर देण्यास भारताचं नौदल सक्षम आहे.