Average Global Temperature : सध्या वातावरणात भयानक चढ उतार पहायाला मिळत आहेत. ग्लोबल वार्मिंगचा परिणाम तापमानावर पहायला मिळत आहे. 2024 या वर्षाने उष्णतेचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. युरोपियन युनियनच्या शास्त्रज्ञांनी 2024 हे वर्ष इतिहासातील सर्वात उष्ण वर्ष असल्याचा दावा केला आहे. या वर्षी जगभरात अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटा आल्या. अनेक ठिकाणी तापमान 36 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. पुढील वर्षीही असाच उकाडा राहील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
संयुक्त राष्ट्रांनी हवामान बदल रोखण्यासाठी 300 अब्ज डॉलर्सच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. वातावरणात होणारे बदल रोखण्याच्या अनुषंगाने उपाययोजना करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीनंतर युरोपियन युनियन कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिस (C3S) ने जगभरातील वाढत्या तापमानाबाबत चिंता व्यक्त केली आहे.
जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत सरासरी जागतिक तापमान हे पूर्व-औद्योगिक कालखंडातील म्हणजेच 1850 ते 1900 च्या तुलनेत दीड अंश सेल्सिअस जास्त होते. याआधी सर्वात उष्ण वर्षाचा विक्रम 2023 च्या नावावर होता. 2024 या वर्षाने सर्व रेकॉर्ड मोडल्याचा दावा युरोपियन युनियन कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिसने केला आहे.
इटली आणि दक्षिण अमेरिकेत भीषण दुष्काळ पहायला मिळाला. मेक्सिको, माली, सौदी अरेबियामध्ये उष्णतेची लाट आली होती. नेपाळ, सुदान आणि युरोपमध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला. धोकादायक चक्रीवादळामुळे अमेरिका आणि फिलीपिन्समध्ये प्रचंड विध्वंस झाला. हवामान बदलाचा हा परिणाम असल्याचे शास्त्रज्ञांच्या अभ्यासात समोर आले आहे.
मागील वर्षीच्या नोव्हेंबरनंतर यंदाचा नोव्हेंबर महिना दुसऱ्या क्रमांकाचा उष्ण महिना ठरला आहे. जगभरात उष्णतेचे नवीन रेकॉर्ड मोडले आहेत. जागतिक तापमानात सातत्याने वाढ होत आहे. पुढील काही महिन्यांत ही परिस्थिती आणखी बिघडू शकते असा इशारा कोपर्निकस हवामान संशोधक ज्युलियन निकोलस यांनी दिला आहे.
जगभरात जीवाश्म इंधनाचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. यातून होणारे कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन तापमान वाढीस कारणीभूत ठरत आहे. हे उत्सर्जन शून्यावर आणणे गरजेचे आहे. या उष्णतेत मनुष्य देखील जळून खाक होईल अशी भिती व्यक्त केली जात
यंदा एल निनोमुळे उष्णता वाढली. पुढील वर्षी तापमानात किंचित घट होण्याची शक्यता आहे. मात्र, पुढील वर्षी उष्णतेची लाट, दुष्काळ, जंगलातील वणवा, चक्रीवादळ यासारख्या घटना घडू शकतात यामुळे तापमानावर याचा परिणाम पहायला मिळेल.