ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे काळाच्या पडद्याआड, मान्यवरांकडून श्रद्धांजली

ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे (Shrikant Moghe) यांचे वृद्धापकाळाने पुण्यात रात्री उशिरा निधन झाले.  

Updated: Mar 7, 2021, 06:59 AM IST
ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे काळाच्या पडद्याआड, मान्यवरांकडून श्रद्धांजली   title=
संग्रहित छाया

मुंबई / पुणे : ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे (Shrikant Moghe) यांचे वृद्धापकाळाने पुण्यात रात्री उशिरा निधन झाले. नाटक, सिनेमातून अभिनयाचा ठसा उमटवणारा कलाकार काळाच्या पडद्याआड गेला आहे. (Film, theatre veteran Shrikant Moghe dead in Pune) दरम्यान, मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीचा रूबाब वागवणारा, चतुरस्र अभिनेता गमावल्याची भावना व्यक्त करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रीकांत मोघे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मोघे यांच्या निधनामुळे कला क्षेत्राला मार्गदर्शकाची उणीव भासत राहील, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

श्रीकांत मोघे यांचा जन्म. ६ नोव्हेंबर १९२९ किर्लोस्करवाडी येथे झाला. एकेकाळी मराठी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रांत ‘चॉकलेट हिरो’अशी प्रतिमा असलेले नायक, वसंत कानेटकर यांच्या ‘लेकुरे उदंड जाली’ नाटकामधील राजशेखर ऊर्फ राजा, पु. ल. देशपांडे यांच्या ‘वाऱ्यावरची वरात’मधील बोरटाके गुरुजी, पु ल देशपांडे यांच्या ‘वाऱ्यावरची वरात’मध्ये ‘दिल देके देखो’या गीतावर रंगमंचावर अक्षरश: शम्मी कपूर शैलीत नृत्य करून रसिकांना मनमुराद आनंद देणारे कलाकार अशी नटश्रेष्ठ श्रीकांत मोघे यांची ओळख होती.

श्रीकांत मोघे हे नाट्य, चित्रपट व दूरचित्रवाणी अभिनेता या बरोबरच ते चित्रकार आणि वास्तुविशारद होते, उत्तम सुगम संगीत गायकही होते. रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात अर्धशतकाहून अधिक काळ रसिकांवर आपल्या सहजसुंदर अभिनयाचा ठसा उमटवणारे श्रीकांत मोघे यांचे वडील कीर्तनकार होते.

श्रीकांत मोघे यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण किर्लोस्करवाडी येथे आणि इंटरपर्यंतचे महाविद्यालयीन शिक्षण सांगलीत विलिंग्डन कॉलेजात झाले. बी.एस्‌‍सी साठी ते पुण्याच्या स.प.कॉलेजात आले. पुढे मुंबईला जाऊन त्यांनी बी.आर्च. ही पदवी घेतली. शाळेत असतानाच ते नाट्य अभिनयाकडे वळले. महाविद्यालयात शिकत असताना भालबा केळकर यांच्या‘बिचारा डायरेक्टर’ या नाटकाचे दिग्दर्शनही श्रीकांत मोघे यांनी केले होते. त्यांनी कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये ‘घराबाहेर’तसेच आचार्य अत्रे यांच्या ‘लग्नाची बेडी’ या नाटकांचे प्रयोग केले. श्रीकांत मोघे यांनी साठांहून अधिक नाटकांत आणि पन्नासहून अधिक चित्रपटांत कामे केली आहेत. 
‘पुलकित आनंदयात्री’ या एकपात्री प्रयोगासाठी श्रीकांत मोघे यांनी अमेरिका, युरोप, दुबई अशा ठिकाणचा दौरा केला. श्रीकांत मोघे यांनी १९५१-५२ मध्ये पुण्यात आल्यानंतर शरद तळवलकर यांच्या हाताखाली पु. ल. देशपांडे यांचे ‘अंमलदार’सादर केले. त्या प्रयोगाला वाळवेकर ट्रॉफी मिळाली होती. पुण्याच्या महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेने १९५५ साली झालेल्या राज्य शासनातर्फे आयोजित पहिल्या राज्य नाट्यस्पर्धेत मामा वरेरकर यांचे ‘अपूर्व बंगाल’ हे नाटक सादर केले. यातील प्रमुख भूमिकेसाठी श्रीकांत मोघे यांना राज्य शासनाचे पारितोषिक मिळाले. 

पुण्यामध्ये किर्लोस्कर ऑईल इंजिन कंपनीत नोकरी करत असतानाच श्रीकांत मोघे यांना नाटकात काम करण्याची ओढ स्वस्थ बसू देईना. भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीत प्रवेश घेण्यासाठी ते दिल्लीला गेले. परंतु अकादमीच्या चमूत प्रवेश मिळाला नाही. पुढे चारुदत्त नावाच्या हिंदी नाटकात त्यांनी साकारलेली छोटीशी भूमिका भारत सरकारातले तत्कालीन नभोवाणी मंत्री डॉ. बाळकृष्ण केसकर यांना खूप आवडली. पुढे श्रीकांत मोघे यांनी १९५६ मध्ये दिल्लीत संगीत नाटक अकादमीत नोकरी करायला सुरुवात केली.

ज्येष्ठ कवी, संगीतकार सुधीर मोघे हे त्यांचे बंधू होत. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत शिवरायांची भूमिका साकारणारे शंतनू मोघे हे सुप्रसिद्ध साहित्यिक कलाकार श्रीकांत मोघे यांचे चिरंजीव आहेत व अभिनेत्री प्रिया मराठे या सूनबाई होत. श्रीकांत मोघे यांनी आपल्या नाट्यप्रवासावर आधारित 'नटरंगी रंगलो' हे आत्मचरित्र लिहिले आहे. त्याचे प्रकाशन ६ फेब्रुवारी २०१५ रोजी बेळगाव येथे भरलेल्या नाट्यसंमेलनात झाले होते. 

अजित पवार यांची श्रद्धांजली 

ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांच्या निधनानं अर्ध्या शतकाहून अधिक काळ मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर अमीट ठसा उमटवणारं दिग्गज व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे. त्यांनी साकारलेल्या विविधांगी भूमिका आणि चतुरस्त्र अभिनयामुळे ते कायम रसिकांच्या स्मरणात राहतील‌‌. रंगभूमी, चित्रपट सृष्टीने मार्गदर्शक, चतुरस्र अभिनेता गमावला, असे ते म्हणाले.

ज्येष्ठ रंगकर्मी गमावला - अमित  देशमुख

 गेल्या सहा दशकांपासून अधिक काळ आपल्या सहजसुंदर अभिनयाने रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांच्या निधनाने ज्येष्ठ रंगकर्मी गमावला आहे, या शब्दांत सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी श्रीकांत मोघे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.