Maharashtra Weather News : महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. विदर्भापासून मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांसह पावसानं हजेरी लावल्यामुळं उर्वरित राज्याच्या एकंदर तापमानावरही याचे परिणाम पाहायला मिळत आहेत. दरम्यान, विदर्भात मात्र गारपीटीचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागानं दिला असून, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पुढील 24 तासांसाठी हे अस्मानी संकट ओढावणार असल्याचा इशारा दिला आहे.
राज्यात सध्या जेऊर येथे 43.5 अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. सध्या देश स्तरावर कर्नाटकच्या दक्षिण भागावर चक्राकार वाऱ्याची स्थिती पाहायला मिळत आहे. तर, विदर्भ, मराठवाडा आणि कर्नाटकच्या अंतर्गत भागापासून तामनिळनाडूपर्यंतही कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळं राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होताना दिसत आहे. दरम्यान, सध्याच्या घडीला राज्यात पूर्वमोसमी पावसासाठी पोषक वातावरण निर्मिती होत असल्याचं निरीक्षणही हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलं आहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा (50-60 किमी प्रतितास वेग) पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf8Es5 भेट घ्या. pic.twitter.com/JXe1HA7PYC
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) May 12, 2024
राज्यातील एकंदर हवामान प्रणाली पाहता पुढील तीन ते चार दिवसांसाठी हीच स्थिती कायम राहणार असून, राज्याच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईमध्ये काही अंशी आकाश ढगाळ राहील, तर दुपारनंतर ते निरभ्र राहण्याची शक्यता आहे. सायंकाळी शहराच्या किनारपट्टी भागांमध्ये सोसाट्याचा वारा सुटेल. तर, ठाणे, पालघर भागातही आकाश अंशत: ढगाळ राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, 30-40 किमी वेगानं वारे वाहण्याचा इशाराही देण्यात आला आहे.