मयुर निकम, झी मीडिया, बुलढाणा : (Baba venga) बाबा वेंगा, नॉस्ट्रेडॅमस या आणि अशा अनेक मंडळींनी केलेल्या अनेक भाकितांची चर्चा या न त्या कारणानं होताना आपण पाहिली आहे. महाराष्ट्रात मात्र सध्या एकाच गोष्टीची चर्चा सुरु असून, त्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. यंदाच्या वर्षात पाऊस-पाणी कसं असेल, नैसर्गिक संकटं येतील का इथपासून अगदी इतरही अनेक गोष्टींसंदर्भातली भाकीतं अवघ्या काही तासांमध्ये केली जाणार आहेत. यंदाच्या वर्षी राजकीय मुद्द्यांवरची भाकीतं जाहीर होणार नसून, त्यामागचं कारण आहे देशात लागू असणारी आचारसंहिता.
पीक परिस्थिती, पाऊसपाणी त्याचबरोबर सामाजिक, आर्थिक आणि देशाच्या राजकीय परिस्थितीचा अंदाज सांगणारी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली भेंडवळची घटमांडणी यावर्षी 10 मे रोजी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पार पडत आहे. यंदाच्या वर्षी पावसाचे अंदाज काय राहतील याकडे संपूर्ण शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
पीक परिस्थितीचा अंदाज, अतिवृष्टी, दुष्काळ, देशाची आर्थिक परिस्थिती, राजकीय भाकीत, पृथ्वीतलावर येणारी संकटं, परकीय शत्रूपासून होणारे धोके अशा अनेक प्रश्नांचे अंदाज मांडणाऱ्या भेंडवळ मांडणीच्या भाकिताकडे शेतकऱ्यांचे आणि जनसामान्यांचेही लक्ष लागलेले असते.
यंदाच्या वर्षी या घटमांडणीचं भाकीत 11 मे रोजी वर्तवलं जाणार आहे. पाणी पाऊस, पीक परिस्थिती, राजकीय स्थिती तसेच आर्थिक संकटं याबाबतचे ठोकताळे या घटमांडणीतून वर्तवले जाणार आहेत. त्यामुळे सामान्य जनतेसोबत, राजकीय लोकांनाही या मांडणीची प्रचंड उत्सुकता असते. यंदाच्या वर्षी देशात लोकसभा निवडणूक सुरू असून, त्या धर्तीवर देशात आदर्श आचारसंहिताही लागू आहे. अद्यापही काही टप्प्यांमधील निवडणूक, मतदान बाकी असल्या कारणाने या ठिकाणी आचारसंहितेचे तंतोतंत पालन करून राजकीय भाकीत जाहीर केलं जाणार नाहीय.