नागपूर: आपण कागदी वाघ नसून, खरे वाघ आहोत, असे सांगत रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला. ते रविवारी नागपूरच्या कोराडी येथे आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, आपण कागदी वाघ नसून, खरे वाघ आहोत. त्यामुळे चार वर्षात केलेले काम जनतेपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आता भाजप पदाधिकाऱ्यांवर असल्याचे त्यांनी म्हटले.
पूर्व विदर्भातील भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक नागपूरच्या कोराडी येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या समारोपाच्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी आगामी काळातील पक्षाच्या वाटचालीविषयी पदाधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण आदेश दिले.
राज्यात सत्ता आल्यापासून भाजप व शिवसेना यांच्यात सातत्याने कुरबुरी सुरु आहेत. भाजपकडून शिवसेनेच्या मंत्र्यांना महत्त्व दिले जात नसल्याची तक्रार सातत्याने शिवसेनेकडून करण्यात येते. अनेकदा हा तणाव टोकालाही पोहोचतो. यावरूनच मध्यंतरी शिवसेनेच्या मंत्र्यांना आम्ही राजीनामे खिशात घेऊन फिरत असल्याचे सांगत सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला होता. मात्र, प्रत्यक्षात सेनेकडून कोणतेही टोकाचे पाऊल उचलण्यात आले नव्हते.