मुंबई : भारतीयांना अनेकदा डासांचा सामना करावा लागतो. डासांमुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांना देखील सामोरे जावे लागते. मात्र डासांना पळवून लावण्यासाठी अनेक उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. आता या उत्पादनांबरोबरच डासांना पळवून लावणारा एक मोबाईल देखील बाजारात आलाय. K7i असे या मॉडेलचे नाव आहे.
या फोनमध्ये वापरलेल्या विशिष्ट ध्वनी तंत्रज्ञायामुळे डास पळवून लावणे शक्त होते. यातून बाहेर पडणाऱ्या अल्ट्रासॉनिक लहरींमुळे सूक्ष्म असा ध्वनी निर्माण होतो. त्यामुळे डास निपचित पडून राहतात. माणसासाठी याचा काहीही तोटा नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. K7i या फोनच्या वापरानंतर ग्राहकांच्या ज्या प्रतिक्रीया येतील त्यावरून कंपनी आपल्या इतर मॉडेल्समध्येही या डास मारण्याच्या यंत्रणेचा समावेश करेल, असे सांगण्यात आले आहे.
या फोनची किंमतही ७,९९० रुपये इतकी असून फोनचा डिस्प्ले ५ इंचाचा आहे. या फोनमध्ये क्वाडकोअर प्रोसेसर वापरण्यात आला आहे. फोनची रॅम २ जीबी तर इंटरनल स्टोरेज १६ जीबी आहे. त्याचबरोबर ८ मेगापिक्सलचा कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. २५०० मिलीअॅम्पियर्सची बॅटरीही देण्यात आली आहे. हा ड्युएल सिम फोन आहे.