भुवनेश्वर : रॉयल एनफील्डची दमदार बाईक बुलेट कोणाला माहिती नसेल तरच नवल. भारतातल्या प्रत्येक भागामध्ये बुलेटचा दणदणीत आवाज ऐकू येतो. प्रत्येक बायकरला बुलेट सवारी करण्याची इच्छा असतेच. पण जास्त किंमत आणि कमी मायलेजमुळे प्रत्येकालाच बुलेट घेणं परवडत नाही आणि बुलेटचं स्वप्न हे स्वप्नच राहतं. पण आता बुलेटचा आवाज तुमच्या घरात आणि गल्लीतही येऊ शकतो. यासाठी जास्त किंमत मोजायचीही गरज नाही. ही बुलेट घेऊन फिरताना मायलेजबद्दल विचार करायचीही गरज नाही.
ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये ६० ते ७० हजारांपर्यंत किंमत असलेली बुलेट आली आहे. दुसऱ्या बाईक प्रमाणेच या बाईकचीही किंमत आहे. एवढच नाही तर ही बुलेट १ लीटर पेट्रोलमध्ये ९० किमी धावते. या बुलेटला रॉयल एनफील्डनं बनवलेलं नाही. रॉयल एनफील्डशी मिळतं जुळतं नाव असलेल्या रॉयल इंडियननं ही बाईक बनवली आहे. या बाईकचा लूक आणि आवाज बुलेटशी मिळता जुळता आहे.
भुवनेश्वरमधला बाईक बिल्डर रॉयल उडोनं ही बुलेट बनवली आहे. ही बुलेट दिसायला बुलेटसारखीच आहे. पण यामध्ये १०० सीसी इंजिन देण्यात आलं आहे. बोल्ट असं या गाडीचं नाव ठेवण्यात आलंय.