Redmi Smartphone: मोबाइलवर व्हिडीओ पाहताना स्फोट झाल्याने एका 8 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. केरळच्या (Kerala) थ्रिसूर (Thrissur) येथे ही घटना घडली आहे. आदित्यश्री असं या चिमुरडीचं नाव असून ती तिसरीत शिकत होती. पोलीसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे. दरम्यान मुलीच्या हातात रेडमी (Redmi) कंपनीचा मोबाइल होता असा दावा केला जात आहे. यानंतर रेडमी कंपनीनेही त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी मोबाइलवर व्हिडीओ पाहत असताना ही घटना घडली. स्थानिक पोलिसांकडून याप्रकरणी तपास सुरु करण्यात आला आहे. पोलिसांसह फॉरेन्सिक टीमही या घटनेचा तपास करत आहे. दरम्यान काही रिपोर्टनुसार, स्फोट झालेला मोबाइल रेडमी कंपनीचा होता. पण पोलिसांनी आठ वर्षांची चिमुरडी नेमक्या कोणत्या कंपनीचा मोबाइल हाताळत होती याची माहिती दिलेली नाही.
यानंतर रेडमीची पालक कंपनी शाओमीने 91Mobiles शी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. "शाओमी इंडियामध्ये ग्राहकांच्या सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य दिलं जात असून, अशा घटनांकडे फार गांभीर्याने पाहिलं जात आहे. आम्ही या कठीणप्रसंगी कुटुंबासोबत असून, शक्य त्या पद्धतीने त्यांना पाठिंबा देण्याचा प्रयत्न करु. काही रिपोर्टनुसार, हा रेडमीचा फोन होता. पण याप्रकरणी तपास सुरु असून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. आम्ही प्रशासनाच्या संपर्कात राहून नेमकं कारण समजून घेऊ आणि शक्य त्या मार्गाने पाठिंबा देण्याचा प्रयत्न करु," असं कंपनीने सांगितलं आहे.
सोमवारी रात्री आदित्यश्री मोबाइल चार्जिंगला लावला असतानाच व्हिडीओ पाहत होता. यावेळी स्फोट झाल्याने ती जखमी झाली. स्फोट झाल्यानंतर मुलीच्या हाताला आणि चेहऱ्याला जखमा झाल्या होत्या. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण डॉक्टर अथक प्रयत्न करुनही तिला वाचवू शकले नाहीत.
तीन वर्षांपूर्वी हा फोन विकत घेण्यात आला होता. तसंच एक वर्षापूर्वी तिची बॅटरी बदलण्यात आली होती. मोबाइलचा स्फोट झाला तेव्हा मुलगी आपल्या आजीसोबत होती.