मुंबई : आणखी एक घातक व्हिडीओ गेम आला आहे, हा गेम तुमच्या मुलांच्या हातात पडू देऊ नका, किंवा हा गेम कसा जीवघेणा आहे, याविषयी जरूर सांगा, मोबाईल, व्हिडीओ गेम्सच्या आहारी जाऊन अनेक, शारीरिक मानसिक विकार जडतात.
व्हिडीओ, किंवा मोबाईल्सवरील गेम्सचा उद्देश हा आनंद देण्याचा असतो, मात्र ‘ब्ल्यू व्हेल’ हा गेम मुलांचा जीव घेत आहे, रशियात या गेममुळे आतापर्यंत जवळपास १०० मुलांचा जीव गेला आहे. रशियात या गेमची दहशत आहे.
मुंबईतही हा गेमने पहिला बळी घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे. मुंबईत अंधेरी पूर्वेकडील ‘शेर ए पंजाब’ वसाहतीत राहणाऱ्या मनप्रीत सिंग या १४ वर्षांच्या विद्यार्थ्यांने शनिवारी संध्याकाळी आत्महत्या केली. मनप्रीतने ‘ब्ल्यू व्हेल’ या ऑनलाइन खेळामुळेच आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
मेघवाडी पोलीस ठाण्यात त्याच्या अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, मात्र पुढील चौकशी आणि तपासानंतर आणखी सखोल माहिती मिळणार आहे. मनप्रीतने आत्महत्या करण्याआधी आपल्या मित्राला कळवलं असल्याचं सांगण्यात येत आहे. मनप्रीतने आपल्या राहत्या गच्चीच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली.
‘ब्ल्यू व्हेल’ या खेळात प्लेअर्सला ५० वेगवेगळी आव्हानं दिली जातात. म्हणजे एखादा हॉरर मुव्ही बघणं, स्वत:ला जखमी करून घेणं अशी घातक आव्हानं असतात.
एवढंच नाही आव्हान पूर्ण झाल्याचा पुरावा प्लेअर्सला द्यावा लागतो. सर्वात वाईट म्हणजे, या खेळ जीव संपवण्याचाच आहे, कारण या खेळाचा शेवटचा टप्पा आत्महत्या करण्याचा आहे.
शेवटच्या टप्प्यात आत्महत्या करण्याचं आव्हान दिलं जातं. प्लेअर्सने हे आव्हान पूर्ण करायचं नाही तर त्याला धमकीचे मेसेजही येतात. या विषयी लंडनमधील काही वेबसाईटने वृत्त दिलं आहे.
यातील आणखी एक भयानक बाब म्हणजे, एकदा का हा गेम डाऊनलोड केला, की तो डिलिट तसेच अनइन्स्टॉलही करता येत नाही, यामुळे युजर्सची पर्सनला माहिती देखील हॅक होण्याची शक्यता आहे, असं काही इंग्रजी वेबसाईटसने आपल्या बातमीत म्हटलं आहे.
‘ब्ल्यू व्हेल’मुळे ज्या मुलांनी आत्महत्या केल्या आहेत, ते सर्व मुलं १२ ते १६ वयोगटातील आहेत. रशियात या खेळामुळे अनेक लहान मुलांचे जीव गेले आहेत, भारतात 'ब्लू व्हेल'मुळे आत्महत्या करण्याची पहिलीच घटना मुंबईत घडली आहे.