चीनला मोठा झटका, भारतानंतर अमेरिकेत TikTok वर बंदी

 चीनला  (China) आणखी एक मोठा झटका बसला आहे. भारतानंतर अमेरिकेत TikTok वरही बंदी घालण्यात आली आहे.  

Updated: Aug 1, 2020, 10:57 AM IST
चीनला मोठा झटका, भारतानंतर अमेरिकेत TikTok वर बंदी   title=
संग्रहित छाया

वॉशिंग्टन : चीनला  (China) आणखी एक मोठा झटका बसला आहे. भारतानंतर अमेरिकेत TikTok वरही बंदी घालण्यात आली आहे. अमेरिकेचे (America) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी शुक्रवारी सांगितले की सुरक्षेचा धोका लक्षात घेता आम्ही TikTok बंदी घालत आहोत.

एअरफोर्स वनवर  (Air Force One) पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, 'जिथपर्यंत TikTok चा प्रश्न आहे, आम्ही त्यावर बंदी घालतोय'. भारताने केलेल्या कारवाईनंतर अमेरिकेत चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागली होती. अनेक खासदार आणि एजन्सींनी TikTokवर हेरगिरी आणि डेटा चोरीचा आरोप केला. ज्यानंतर आता अमेरिकेनेही TikTok बंदी घातली आहे.

यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले होते, आम्ही प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून आहोत. आम्ही TikTok वर बंदी घालू शकतो, तसेच आम्ही इतर काही पर्यायांवर विचार करीत आहोत. परंतु तो कोणत्या पर्यायांविषयी बोलत आहे हे त्यांनी स्पष्ट केले नाही. त्याचवेळी दोन प्रमुख अमेरिकन वृत्तपत्रांनी असा दावा केला आहे की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देत बाइटडान्सला सांगितले, TikTok अमेरिकेच्या ऑपरेशन्सला देण्यात यावे. मायक्रोसॉफ्ट TikTok ची खरेदी करण्यासाठी सर्वात पुढे आहे. या दोन कंपन्यांमध्ये वाटाघाटीही सुरु झाल्या आहेत. परंतु, दोघांनीही याला दुजोरा दिलेला नाही.

TikTok ने विक्रीच्या बातमीवर भाष्य करण्यास नकार दिला. परंतु वृत्तसंस्था एएफपीच्या मते, ते नक्कीच म्हणाले आहे की 'आम्हाला TikTokच्या दीर्घकालीन यशावर विश्वास आहे. मनोरंजन आणि कनेक्शनसाठी लाखो लोक TikTokला भेट देतात, ज्यात आमच्या निर्माते आणि कलाकारांच्या समुदायाचा समावेश आहे.

चौफेर टिकेनंतर TikTok आपल्यावरील आरोप खोटे असल्याचे सिद्ध करण्याचा काम करत आहे. आपण चीनसाठी हेरगिरी करीत नाही. अलीकडेच, TikTok चे मुख्य कार्यकारी अधिकारी केविन मेयर म्हणाले की, TikTok पारदर्शकतेसाठी वचनबद्ध आहे. आमचा राजकीय संबंध नाही. आम्ही राजकीय जाहिरात स्वीकारत नाही आणि कोणताही अजेंडा नाही - आमचे एकमेव उद्दिष्ट आहे की सर्वांनी आनंद घेण्यासाठी एक ज्वलंत, गतिमान व्यासपीठ उपलब्ध करुन देणे. आज TikTok हे सर्वात मोठे लक्ष्य ठरले आहे, परंतु मला हे स्पष्ट करायचे आहे की, आम्ही कोणाचेही शत्रू नाही.

दरम्यानस लडाख हिंसाचारानंतर भारताने कारवाई करताना TikTok सह अनेक चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली. तेव्हापासून अमेरिकेत TikTokवर कारवाई करण्याची मागणीही जोर धरू लागली होती. अमेरिका TikTokला राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका असल्याचे मानत आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ अनेक नेत्यांनी या बंदीबद्दल बोलले होते.