Kapil Sharma : सैलिब्रिटी हे नेहमीच त्यांच्या कामामुळे चर्चेत असतात. कोणी त्यांच्या कामाची स्तुती करतात तर कोणी त्यांच्या कामामुळे नाराज होतात. अनेकदा त्यामुळे त्यांना धमक्या देखील मिळाल्याचे आपल्याला ऐकायला मिळते. दरम्यान, आता झालेल्या घटनेनं एक गोष्ट समोर आली आहे की एक नाही तर एकत्र 4 कलाकारांना धमकीचे मेल आले आहेत. कपिल शर्मा, राजपाल यादव, रेमो डिसोझा आणि सुगंधा मिश्रा यांना धमकीचे मेल करण्यात आले आहेत. या मेलमधून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ईमेल पाठवणाऱ्यानं त्यांना थेड जिवे मारण्याची धमकी दिली आहे. याबाबत मुंबई पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
ईमेलमध्ये नेमकं काय?
बॉलिवूडमधील सेलिब्रिटींना जीवे मारण्याच्या धमक्यांचा सिलसिला थांबायचे नाव घेत नाहीये. दररोज कोणत्या ना कोणत्या कलाकाराला धमकी मिळत आहे. रिपोर्टनुसार, यावेळी कॉमेडियन कपिल शर्माला धमकीचा ईमेल आला आहे. त्यासोबत राजपाल यादव, रेमो डिसोझा आणि सुगंधा मिश्रा यांना देखील धमकीचा ईमेल आला आहे. ज्यामध्ये लिहिले आहे की, तुम्ही अलीकडे केलेल्या सर्व कृतींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. ही बाब आपल्या निदर्शनास आणून देणे गरजेचे आहे. हा पब्लिसिटी स्टंट किंवा तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न नाही. कृपया हा संदेश गांभीर्याने घ्या, जर तुम्ही आमची मागणी पूर्ण केली नाही तर गंभीर परिणामांना सामोरे जाण्यास तयार राहा. येत्या 8 तासांत या ईमेलला प्रतिसाद न मिळाल्यास आम्ही आवश्यक ती कारवाई करू असं त्या ईमेलमध्ये म्हटलं आहे.
पाकिस्तानमधून धमकीचा ई-मेल
या सेलिब्रिटींच्या तक्रारीनंतर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत. त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. असे सांगण्यात येत आहे की हे धमकीचे ईमेल पाकिस्तानमधून आले आहेत, ज्याचा पत्ता don99284@gmail.com आहे. ते पाठवणाऱ्या व्यक्तीचे नाव विष्णू असल्याचे सांगण्यात येत असून, त्याने या सेलिब्रिटींना धमकी दिली आहे.