मोबाईल वापरामुळे खरंच मेंदूचा कर्करोग होतो? ऑक्सफर्ड विद्यापीठानं दिलं उत्तर

मोबाईल आणि मेंदूच्या कर्करोगाचा संबंध शोधण्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधकांनी यूकेमधील ४ लाख लोकांवर संशोधन केले.

Updated: Apr 1, 2022, 07:42 PM IST
मोबाईल वापरामुळे खरंच मेंदूचा कर्करोग होतो? ऑक्सफर्ड विद्यापीठानं दिलं उत्तर title=

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेकदा अशा बातम्या शेअर केल्या जातात, ज्यामध्ये दावा केला जातो की, मोबाइल फोनच्या जास्त वापरामुळे वापरकर्त्याला ब्रेन ट्यूमर होऊ शकतो. यात किती तथ्य आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. हे जाणून घेण्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या संशोधकांनी संशोधन केले आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की, मोबाईल जेव्हा जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे, तेव्हा त्याबद्दल सोशल मीडियावर विविध गोंधळात टाकणाऱ्या गोष्टी शेअर केल्या जात आहेत, मात्र याच्या उलट अनेक गोष्टी संशोधनातून समोर आल्या आहेत.

उदाहरणार्थ, मोबाईल फोनच्या रोजच्या वापरामुळे ब्रेन ट्यूमर किंवा ब्रेन कॅन्सरचा धोका वाढत नाही. मोबाईल आणि ब्रेन ट्यूमरचा काही संबंध आहे का, किती लोकांवर संशोधन झाले आणि त्यात कोणत्या विशेष गोष्टी समोर आल्या? जाणून घ्या.

मोबाईल आणि मेंदूच्या कर्करोगाचा संबंध शोधण्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधकांनी यूकेमधील ४ लाख लोकांवर संशोधन केले. जवळपास दशकभर त्यांचा मागोवा घेण्यात आला.

संशोधनात समाविष्ट असलेल्या ४ लाख लोकांचे वय 50 ते 80 वयोगटातील होते. हे संशोधन 2001 ते 2011 दरम्यान करण्यात आले. हे लोक तो फोन कधी आणि किती वापरतात, याची माहिती घेण्यात आली. त्यांची उत्तरे आरोग्य नोंदींशी जुळत होती. त्यानंतर त्यांच्यामध्ये ब्रेन ट्यूमर तर विकसित झाला नाही ना, याची तपासणी करण्यात आली.

जर्नल ऑफ नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या रिपोर्टनुसार, असे अनेक सिद्धांत समोर आले आहेत, ज्यात असा दावा करण्यात आला आहे की, मोबाईल फोनमधून निघणाऱ्या रेडिओ लहरी कवटीच्या आत प्रवेश करतात आणि मेंदूपर्यंत पोहोचतात आणि त्यामुळे कर्करोग होतो.

कालांतराने ते 5G आणि कोरोना महामारी सारख्या इतर गोष्टींसह एकत्र केले गेले आणि कर्करोगाचा दावा केला गेला. पण त्यात तथ्य नाही.

संशोधन अहवालात म्हटले आहे की, मोबाईल फोनमुळे लोकांमध्ये कॅन्सर होण्याची भीती आहे. याची सुरुवात 1990 पासून झाली, जेव्हा हळूहळू मोबाईल हा लोकांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनू लागला.

कॅन्सर रिसर्च यूकेच्या मते, गेल्या 20 वर्षांत ब्रेन ट्यूमरच्या प्रकरणांमध्ये 39 टक्के वाढ झाली आहे. 2011 मध्ये, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने सांगितले की, फोनमुळे कर्करोग होऊ शकतो, परंतु अपूर्ण डेटामुळे संस्थेने आपला दावा मागे घेतला.

त्यामुळे अद्याप हे पूर्णपणे सिद्ध झालेले नाही की, नक्की मोबाईल फोनमुळे ब्रेन कॅन्सर होतो की नाही ते. शास्त्रज्ञ याबाबत अनेक रिसर्च करत आहेत आणि यामागचं उत्तर त्यांना लवकरच सापडेल अशी त्यांना आशा आहे.