आता ‘बीएसएनएल’ही आणणार स्वस्त फीचर फोन

रिलायन्स जिओने फीचर फोन लॉन्च करून मोबाइलची बाजारपेठेत धमाका केल्यानंतर आता आणखी एक कंपनी फीचर फोन घेऊन येत आहे.

Updated: Sep 19, 2017, 08:26 AM IST
आता ‘बीएसएनएल’ही आणणार स्वस्त फीचर फोन title=

नवी दिल्ली : रिलायन्स जिओने फीचर फोन लॉन्च करून मोबाइलची बाजारपेठेत धमाका केल्यानंतर आता आणखी एक कंपनी फीचर फोन घेऊन येत आहे.

आता ‘भारत संचार निगम लिमिटेड’ अर्थात ‘बीएसएनएल’ने फिचर फोन लॉन्च करण्याचा निर्णय घेतलाय. ‘बीएसएनएल’तर्फे दिवाळीपर्यंत दोन हजार रुपये किमतीचा फीचर फोन सादर करण्यात येणार आहे. एका खासगी टेलिकॉम संस्थेने या विषयीचे वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार दिवाळीपूर्वी ‘बीएसएनएल’तर्फे हा फोन सादर करण्यात येण्याची दाट शक्यता आहे. 

‘अजूनही स्मार्टफोन न परवडणाऱ्यांसाठी फीचर फोन ही एक संधी ठरू शकते. या पार्श्वभूमीवर आम्ही साधारणतः महिनाभरात फीचर फोन सादर करणार आहोत,’ अशी माहिती बीएसएनएलचे अध्यक्ष अनुपम श्रीवास्तव यांनी दिली. या फोनच्या निर्मितीसाठी मायक्रोमॅक्स आणि लाव्हा या भारतीय कंपन्यांनी तयारी दर्शवल्याचेही श्रीवास्तव यांनी नमूद केले. 

रिलायन्स जिओतर्फे सादर करण्यात आलेल्या फीचरफोनमध्ये फोर-जीचा अंतर्भाव करण्यात आला आहे. बीएसएनएलचा फीचर फोन साधारण १९ ऑक्टोबरच्या दरम्यान बाजारात येण्याची शक्यता आहे.