Renault Electric Motorcycle Launched: ऑटो क्षेत्रामध्ये जग बरंच पुढं गेलं असून विचारही करता येणार नाही, अशी वाहनं दर दिवसाआड वाहनप्रेमींच्या भेटीला येत आहेत. त्यातच आता एका अफलातून बाईकची भर पडली असून, नुकतंच 'पॅरिस मोटर शो'मध्ये रेनॉनं 4 ई-टेक इलेक्ट्रिक कार सादर केली आणि त्यामागोमाग हेरीटेज स्प्रिट स्क्रॅम्बलर बाईकचीसुद्धा झलक दाखवली.
रेनॉ (Renault)च्या वतीनं सादर करण्यात आलेली ही एक इलेक्ट्रीक बाईक असून, तिच्या ईव्ही वर्जनची किंमत 23340 युरो म्हणजेच जवळपास 21.2 लाख रुपये इतकी सांगितली जात आहे. आश्चर्याची बाब म्हणजे भारतात मिळणारी आणि अनेकांचीच पसंती असणारी महिंद्राची स्कॉर्पिओ एन हीसुद्धा या बाईकपेक्षा स्वस्त आहे. स्कॉर्पिओची किंमत साधारण 13.85 लाख रुपयांपासून सुरू होऊन 24.54 लाख रुपयांच्या घरात आहे.
रेनॉचीही बाईक फ्रान्समधील Ateliers हेरीटेज बाइक्सचं ब्रेनचाईल्ड असून, भारतातील ईव्हीच्या तुलनेत तिची किंमत जास्तच सांगितली जात आहे. या बाईकचं वैशिष्ट्य म्हणजे ती पूर्णपणे मानवी श्रमांतूनच तयार करण्यात आली आहे. सध्या या बाईकचे फार कमी मॉडेल सध्या लाँच करण्यात आले असून, त्यासाठीची बुकिंगही कंपनीकडून सुरू करण्यात आली आहे.
रेनॉचीही इलेक्ट्रीक बाईक एक निओ रेट्रो स्क्रॅम्बलर असून, या बाईकमध्ये एलईडी DRLs सोबत एलईडी हेडलाईट देण्यात आली आहे. बाईकवर असणारी सीट सिंगलपीस रिब्ड डिझाईनमध्ये असून, या बाईकला मोठा हँडलबार देण्यात आला आहे. 4.8 kWh ची बॅटरी असणारी ही बाईक 10 bhp इतकं पीक पॉवर देते, तर 280 Nm पीक टॉर्क देते. कंपनीनं दावा केल्यानुसार ही बाईक इतकी कमाल आहे की, सिंगल चार्जिंगमध्ये ही बाईक 110 किमी अंतर अगदी सहज ओलांडते. चारचाकी वाहनांनाही टक्कर देणारी ही बाईक सध्या अॅडव्हेंचर रायडिंग करणाऱ्या अनेकांच्याच मनाचा ठाव घेत आहे.