नवी दिल्ली : रिलायन्स जिओने 4G स्मार्टफोन बाजारात उतरवल्यावर टेलिकॉम क्षेत्रातील इतर कंपन्या खडबडून जाग्या झाल्या नसत्या तरच नवल. त्यामुळे रिलायन्सची एक स्पर्धक कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एअरटेलनेही रिलायन्स जिओला टक्कर देण्यासठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले असून, एअरटेलही आता आपला 4G स्मार्टफोन घेऊन बाजारात उतरत आहे.
एअरटेलच्या 4G स्मार्टफोनची सध्या जोरदारच चर्चा सुरू आहे. अर्थात एअरटेल देऊ करत असलेला स्मार्टफोन हा स्वत: एअरटेलचा नाही. 4G स्मार्टफोन बाजारत उतरविण्यासाठी एअरटेलने फोन निर्माती कंपनी सेलकॉनला सोबत घेतले आहे. या दोन्ही कंपन्या मिळून 4G स्मार्टफोन बाजारात उतरवत आहेत. एअरटेलचा हा 4G स्मार्टफोन १३४९ रूपयांत उपलब्द होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी 'माझा पहिला स्मार्टफोन' ही पंचलाईन वापरून एअरटेल कॅम्पेन करण्याची योजना आखत असल्याची माहिती आहे.
प्राप्त माहितीनुसार 'सेलकॉन स्मार्ट 4G' हा फोन बाजारात ३,५०० रूपयांना बाजारात उपलब्ध आहे. बेसीक फिचर्स सोबतच ४ इंचाची टचस्कीन, ड्यूअल सिम आणि एफएम रेडिओ अशी फिचर्स या मोबाईलमध्ये आहेत. हा फोन अॅडॉईडयुक्त असून, गुगल प्ले स्टोअर्सवर मिळणाऱ्या सर्व सेवा या फोनवर वापरायला मिळतात. ज्यात यूट्यूब, फेसबुक, व्हाट्सअॅपचाही समावेश आहे.
दरम्यान, या फोनमध्ये एअरटेल अॅप, विंक म्यूजिक आणि एअरटेल टीव्ही अॅप प्रीलोडेडच असतील. एअरटेल हा स्मार्टफोन १६९ रूपयांना मासिक पॅकसोबत मिळणार आहे. ज्यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटाही मिळणार आहे.
दरम्यान, ही ऑफर घेण्यासाठी ग्राहकाला २,८४९ रूपयांचे डाऊनपेमेंट करावे लागणार आहे. तसेच, ३६ महिने प्रतिमहिना १६९ रूपयांचे रिचार्जही करावे लागणार आहे. १८ महिन्यांनतर ग्राहकाला ५०० रूपयांचा कॅश रिफंड मिळेल आणि ३६ महिन्यांनतर १,००० रूपयांचा कॅश रिफंड मिळेल. अशा पद्धतीने ग्राहकाला सुमारे १५०० रूपये परत मिळतील.