Yuvraj Singh All Time XI: भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने सर्वकालीन सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन संघ निवडला आहे. विशेष म्हणजे युवराजने निवडलेल्या या संघामधून एक फार महत्त्वाचं नाव गायब आहे. हे नाव म्हणजे भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी. भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार राहिलेल्या धोनीला युवराजने त्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा दिली नाही. धोनीने भारताला तीन आयसीसी ट्रॉफी जिंकून दिल्या आहेत. युवराजने आपल्या सर्वकालीन सर्वोत्तम संघामध्ये सलामीवीर म्हणून भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉण्टींगला निवडलं आहे. युवराजने त्याच्या संघात तिसऱ्या क्रमांकावर रोहित शर्माला पसंती दिली आहे.
युवराज सिंगने चौथ्या स्थानी विराट कोहली उत्तम ठरेल असं म्हटलं आहे. त्यानंतर पाचव्या स्थानी युवराज सिंगने दक्षिण आफ्रिकेचा मिस्टर 360 डिग्री ए. बी. डिव्हिलिअर्सला संधी दिली आहे. विकेटकीपर म्हणून युवराजने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार अॅडम गिलक्रिस्टचा समावेश संघात केला आहे. तर अष्टपैलू खेळाडू म्हणून अँड्रयू फ्लिंटॉफला युवराजने संघात स्थान दिलं आहे. वेगवान गोलंदाज म्हणून युवराजने वसिम अक्रम आणि ग्लेन मॅग्राथला संघात स्थान दिलं आहे. फिरकीपटू म्हणून युवराने मुथया मुरलीधरन आणि शेन वॉर्न या दोघांना संघात स्थान दिलं आहे. म्हणजेच युवराजच्या संघात केवळ तीन भारतीयांना स्थान असून तिघेही फलंदाजच आहेत.
युवराजने निवडलेला हा संघ अनेकांना उत्तम वाटत असला तरी यामध्ये धोनीचा समावेश हवा होता असं बऱ्याच जणांनी म्हटलं आहे. धोनी हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार असून जगातील सर्वोत्तम फिनिशर म्हणून आजही धोनीच्या निवृत्तीनंतर अनेक वर्षानंतरसुद्धा त्याचं नाव आवर्जून घेतलं जातं. धोनी आणि युवराज एकत्र अनेक वर्ष खेळले असले तरी त्यांचं नातं फारच प्रोफेश्नल होतं. आम्ही काही फार छान मित्र वगैरे नाही असं युवराजनेच एकदा सांगितलं होतं.
— Out Of Context Cricket (@GemsOfCricket) July 13, 2024
युवराज सिंगने वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लिजंड्स 2024 ही स्पर्धा जिंकल्यानंतर हा संघ निवडला. युवराज सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने या स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये पाकिस्तानला पराभूत करत जेतेपद पटावलं. भारतीय संघाने वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लिजंड्स 2024 चा अंतिम सामना 5 विकेट्सने जिंकला आहे. भारताने या सामन्यामध्ये कट्टर प्रतीस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला पराभूत केलं आहे. भारतीय वेळेनुसार शनिवारी रात्री उशीरा बर्मिंगहम येथे झालेल्या या सामन्यामध्ये पाकिस्तानने भारताने समोर ठेवलेलं आव्हान भारतीय खेळाडूंनी 5 विकेट्स आणि 5 चेंडू शिल्लक असतानाच गाठलं.
सचिन तेंडुलकर
रिकी पॉण्टींग
रोहित शर्मा
विराट कोहली
ए. बी. डिव्हिलिअर्स
अॅडम गिलक्रिस्ट
अँड्रयू फ्लिंटॉफ
वसिम अक्रम
ग्लेन मॅग्राथ
मुथया मुरलीधरन
शेन वॉर्न