Video: स्टार्कच्या नावाने घोषणा देणाऱ्या ऑस्ट्रेलियन चाहत्यांचा माज रोहितने 3 शब्दात उतरवला

Rohit Sharma Heckled By Aussie Fans: रोहित शर्मा सध्या अमेरिकेमध्ये असून एका कार्यक्रमात भारतीय संघाच्या कर्णधाराची हुर्यो उडवण्याचा प्रयत्न ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी केला. त्यावेळेस रोहितने काय केलं पाहा...

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 18, 2024, 12:18 PM IST
Video: स्टार्कच्या नावाने घोषणा देणाऱ्या ऑस्ट्रेलियन चाहत्यांचा माज रोहितने 3 शब्दात उतरवला title=
कार्यक्रमातील व्हिडीओ व्हायरल

Rohit Sharma Heckled By Aussie Fans: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या चांगलाच चर्चेत आहे. टी-20 वर्ल्ड कप 2024 वर रोहितच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने नाव कोरलं. त्यानंतर झालेलं सेलिब्रेशन, पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, मुंबईत ओपन बसमधून सेलिब्रेशन, वानखेडेमधील सत्कार, महाराष्ट्राच्या विधीमंडळामधील सत्कार या साऱ्यामध्ये रोहित अगदी मनापासून सारं काही एन्जॉय करताना दिसला. रोहितेने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर अंतरराष्ट्रीय टी-20 मधून निवृत्ती जाहीर केल्याने हे सेलिब्रेशन तो डिझर्व्ह करतो असं चाहत्यांचं म्हणणं आहे. असं असतानाच दुसरीकडे रोहित पत्नी ऋतिका आणि मुलगी समायराबरोबर फिरायला गेला आहे. रोहित विम्बल्डनची सेमीफायनल पाहण्यासाठीही पोहोचला होता. रोहितच्या विम्बल्डन लूकनेही अनेकांचं लक्ष वेधून घेतलं.

रोहितची हुर्यो उडवण्याचा प्रयत्न...

दरम्यानच्या काळात ऑस्ट्रेलियन गोलंदाज मायकल स्टार्कने रोहित शर्माकडून टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर एटच्या सामन्यात झालेल्या जबरदस्त धुलाईसंदर्भात आपल्या भावना व्यक्त केल्या. भारतीय कर्णधाराबद्दल बोलताना स्टार्कने त्याला रोहितकडून खाव्या लागलेल्या 5 षटकारांचा आवर्जून उल्लेख केला. रोहितने स्टार्कच्या एका ओव्हरमध्ये 29 धावा केल्या होत्या. वर्ल्ड कपमधील हा सर्वात चर्चेतील किस्सा राहिला. 19 नोव्हेंबर रोजी भारतीय संघ एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये पराभूत झाल्यानंतर भारतीय संघ पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळत होता. त्यामुळेच रोहितचा हा पराक्रम चांगलाच चर्चेत राहिला. रोहितने स्टार्कसारख्या वर्ल्ड क्लास गोलंदाजाच्या गोलंदाजीवर केलेली फटकेबाजी भारतीय चाहत्यांसाठी डोळ्यांचं पारणं फेडणारी असली तरी ऑस्ट्रेलियन चाहत्यांसाठी मात्र वेदनादायी होती. त्यामुळेच ही जखम अजूनही ताजी असलेल्या ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी सध्या अमेरिकेमध्ये असलेल्या रोहितच्या एका कार्यक्रमामध्ये 'मायकल स्टार्क'च्या नावाचा जयघोष करत रोहितची हुर्यो उडवण्याचा प्रयत्न केला. मात्र रोहितने त्याला जशास तसं उत्तर देत अवघ्या 3 शब्दात या हुल्लडबाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियन चाहत्यांचा माज उतरवला. 

रोहित नेमकं काय म्हणाला?

रोहितच्या फटकेबाजीला मैदानात ऑस्ट्रेलियन संघाकडे काही उत्तर नसल्याने अशाप्रकारे चाहत्यांकडून रोहितची हुर्यो उडवण्याचा प्रयत्न झाला. रोहित समोर काही चाहते वारंवार मायकल स्टार्कच्या नावाची घोषणाबाजी होत असल्याचं पाहून अँकरने या चाहत्यांना, "सन्मानपूर्वक वागणूक तुमच्याकडून अपेक्षित आहे," असं म्हटलं. त्यानंतरही मायकल स्टार्कच्या नावाची घोषणाबाजी सुरुच होती. अखेर रोहितनेच, "शांत व्हा, पोरांनो" असं चाहत्यांना सांगितलं. रोहितने आपल्या खास शैलीत ऑस्ट्रेलियन चाहत्यांना घोषणाबाजी बंद करण्याची विनंती केली. रोहित ज्या खोचक पद्धतीने 'Calm down, guys,' म्हणाला ते ऐकून उपस्थितांमध्ये एकच हसू पिकलं.

रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तब्बल 17 वर्षानंतर टी-20 वर्ल्ड कप जिंकला. रोहितने या विजयासहीत कपील देव, एम. एस. धोनी यासारख्या दिग्गजांच्या यादीत स्थान मिळवलं आहे.