मुंबई : २०१९ सालची शेवटची वनडे भारताने रविवारी खेळली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या या वनडेमध्ये भारताचा रोमांचक असा विजय झाला. या विजयाबरोबरच भारताने २०१९ या वर्षाचा शेवट गोड केला. २०१९ वर्ल्ड कपची सेमी फायनल वगळता संपूर्ण वर्षावर भारताचा आणि भारतीय खेळाडूंचा दबदबा राहिला. यावर्षी भारतीय टीमने आणि खेळाडूंनी अनेक विक्रम आपल्या नावावर केले.
भारताने या वर्षात सर्वाधिक १९ वनडे मॅच जिंकल्या. भारताने या वर्षात जवळपास ७०.३७% मॅचमध्ये विजय मिळवला. २०१९ मध्ये भारताने एकूण २८ वनडे मॅच खेळल्या. यातल्या एका मॅचचा निकाल लागला नाही तर ८ मॅचमध्ये पराभव पत्करावा लागला. वेस्ट इंडिजनेही भारताप्रमाणेच सर्वाधिक २८ मॅच खेळल्या, पण त्यांना फक्त १० मॅचच जिंकता आल्या. भारताने इतर टीमपेक्षा सर्वाधिक मॅच या वर्षात जिंकल्या.
रोहित शर्माने वनडे क्रिकेटमध्ये या वर्षभरात सर्वाधिक रन केले. रोहितने २८ मॅचच्या २७ इनिंगमध्ये ५७.३० च्या सरासरीने १,४९० रन केले. या यादीत भारताचा कर्णधार विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर राहिला. विराटने २६ मॅचमध्ये १,३७७ रन केले. वेस्ट इंडिजच्या शाय होपने १,३४५ रन, ऑस्ट्रेलियाच्या एरॉन फिंचने १,२७६ रन आणि पाकिस्तानच्या बाबर आजमने १,०९२ रन केले.
रोहित शर्माने या वर्षभरात वनडेमध्ये ७ शतकं केली आहेत. या वर्षातली ही सर्वाधिक शतकं आहेत. तसंच एका वर्षात सर्वाधिक शतकं करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. एका वर्षात वनडेमध्ये सर्वाधिक शतकं करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने १९९८ साली ९ वनडे शतकं केली होती.
रोहितनंतर विराट कोहलीने यावर्षी ५ शतकं केली. एरॉन फिंच आणि शाय होपने प्रत्येकी ४-४ शतकं केली. डेव्हिड वॉर्नर, जेसन रॉय, जॉस बटलर, जॉनी बेयरस्टो, बाबर आजम, मार्टिन गप्टील, जो रुट, इमाम उल हक आणि एंडी बलबिर्नी यांनी यावर्षी प्रत्येकी ३-३ शतकं केली.
एका वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक शतकं करण्याचा विक्रमही रोहित शर्माने यावर्षी स्वत:च्या नावावर केला. रोहित शर्माने या वर्ल्ड कपमध्ये एकूण ५ शतकं केली. आतापर्यंतच्या सगळ्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक शतकं करण्याचा विक्रमही रोहितने केला. रोहितच्या नावावर वर्ल्ड कपमध्ये ६ शतकं आहेत. याबाबतीत रोहितने सचिनच्या विक्रमाशी बरोबरी केली.
२०१९ वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक रन करण्याचा विक्रमही रोहित शर्माच्या नावावर झाला. रोहित शर्माने या वर्ल्ड कपमध्ये ९ इनिंगमध्ये ८१ ची सरासरी आणि ९८.३३ च्या स्ट्राईक रेटने ६४८ रन केले.
२०१९ साली वनडेमध्ये सर्वाधिक विकेट मोहम्मद शमीने घेतल्या. शमीने या वर्षी २१ मॅचमध्ये ४२ विकेट पटकावल्या. ट्रेन्ट बोल्ट या यादीत दुसऱ्या क्रमांकावर राहिला. बोल्टने २० मॅचमध्ये ३८ विकेट घेतल्या. न्यूझीलंडच्या लॉकी फर्ग्युसनने ३५ विकेट, बांगलादेशच्या मुस्तफिजुर रहमानने ३४ विकेट, भुवनेश्वर कुमारने ३३ विकेट घेतल्या. भारताचेच कुलदीप यादव सहाव्या आणि युझवेंद्र चहल नवव्या क्रमांकावर राहिले. कुलदीपने या वर्षात ३२ विकेट आणि चहलने २९ विकेट घेतल्या.
२०१९ मध्ये क्रिस गेलने सर्वाधिक सिक्स मारले. गेलने १७ मॅचमध्ये ५६ सिक्स लगावले. रोहित शर्मा ३६ सिक्ससह तिसऱ्या क्रमांकावर राहिला. इंग्लंडचा कर्णधार इयन मॉर्गनने ४१ सिक्स लगावले. ऑस्ट्रेलियाच्या एरॉन फिंचने रोहितएवढेच ३६ सिक्स मारले, तर जॉस बटलरला ३२ सिक्स मारता आहे.