वर्ल्डकप जिंकला, आपण नाचायला पाहिजे...; मुंबईकर रोहित शर्मा मराठीत भरभरून बोलला!

Rohit Sharma: दिल्लीनंतर टीम इंडियाचं मुंबईत जंगी स्वागत करण्यात आलं. टीम इंडियाची नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत विजयी मिरवणूक काढण्यात आली. 

सुरभि जगदीश | Updated: Jul 5, 2024, 08:47 AM IST
वर्ल्डकप जिंकला, आपण नाचायला पाहिजे...; मुंबईकर रोहित शर्मा मराठीत भरभरून बोलला! title=

Rohit Sharma in Victory Parade: टीम इंडिया टी-20 वर्ल्डकप जिंकून मायदेशी परत आल्यानंतर त्यांचं जल्लोषात स्वागत केलं गेलं. मरिन ड्राईव्ह ते वानखेडेपर्यंत निघालेल्या रॅलीमध्ये हजारो चाहत्यांनी तुडूंब गर्दी केली होती. यावेळी दिल्लीनंतर टीम इंडियाचं मुंबईत जंगी स्वागत करण्यात आलं. टीम इंडियाची नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत विजयी मिरवणूक काढण्यात आली. जवळपास 2 तास ही विजयी मिरवणूक चालली. दरम्यान यानंतर रोहित शर्मा प्रसार माध्यमांशी मराठी बोलला. 

रोहित शर्माचं खास मराठी संभाषण

वानखेडेतील कार्यक्रम झाल्यानंतर मराठीत बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, "वर्ल्डकप जिंकल्याचा सर्वांनाच फार आनंद झाला आहे. तब्बल 11 वर्षांनंतर टीम ट्रॉफी भारतात आली आहे. त्यामुळे सर्व भारतीय फार खुशीत आहेत. निवृत्ती घेण्याची ही अगदी योग्य वेळ होती. 2007 चा वर्ल्डकप माझ्यासाठी तितकाच स्पेशल होता आणि आताचा हा वर्ल्डकप पण तितकाच खास आहे. भारताने वर्ल्डकप जिंकला आहे आपण नाचायला पाहिजे." 

रोहितला पाहताच चाहत्यांचा जल्लोष

विक्टरी परेडनंतर वानखेडे मैदानावर खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये टीम इंडियाने वानखेडे स्टेडियममध्ये येताच डान्स केला. राष्ट्रगीत पार पडल्यानंतर कौतुक समारंभाला सुरुवात झाली. रोहित शर्मा त्याच्या संभाषणाला सुरुवात करताच चाहत्यांनी “रोहित रोहित”, अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. चाहते इतके उत्सुक झाले होते की, रोहित शर्माला त्यांना हात दाखवून थांबण्याचा इशारा करावा लागला. 

या कार्यक्रमादरम्यान बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, ही ट्रॉफी संपूर्ण भारत देशाची आहे. तसंच वर्ल्डकपचे सामने पाहणाऱ्या सर्व चाहत्यांचे मी आभार मानतो. गेल्या तीन-चार वर्षांपासून आम्ही केलेल्या मेहनतीचे फळ अखेर आम्हाला मिळालं आहे. मला माझ्या माझ्या या टीमचा अभिमान आहे. मी फार लकी आहे की, मी या टीमचा कर्णधार आहे. आम्ही वर्ल्डकप जिंकल्यानंतर कोट्यवधी लोकांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं आहे.

रोहितकडून हार्दिक पंड्याचं कौतुक

वानखेडे स्टेडियममधील कार्यक्रमात बोलताना रोहित शर्माने सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्याचं कौतुक केलं. रोहित म्हणाला की, हार्दिक पांड्याने टाकलेलं षटक निर्णायक ठरलं. त्याचप्रमाणे सूर्यकुमार यादवनेही भन्नाट कॅच घेतला. पांड्याच्या शांत आणि संयमी क्षमतेमुळे भारताला डेव्हिड मिलरला बाद करण्यात मदत झाली. मिलरला टीम जगातील सर्वात धोकादायक खेळाडूंपैकी एक मानत होती.