मुंबईत राहणारे प्रदीप नाखवा (Pradeep Nakhava) आणि त्यांच्या पत्नी कावेरी नाखवा (Kaveri Nakhava) यांच्यासाठी रविवारचा दिवस नेहमीप्रमाणे सुरु झाला होता. वरळीच्या कोळीवाड्यात (Worli Koliwada) राहणारं हे नाखवा दांपत्य मासे विकण्याचा व्यवसाय करत होतं. यासाठीच मासे खरेदी करण्यासाठी ते ससून डॉकला निघाले होते. तेथून मासे खरेदी करुन ते विक्रीसाठी पुन्हा ते परतत असताना एका वेगवान बीएमडब्ल्यूने (BMW) त्यांच्या स्कूटरला धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की दोघे हवेत फेकले गेले. प्रदीप खाली जमिनीवर पडले, मात्र कावेरी यांना कारने फरफटत नेलं. त्यांना रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं.
वरिष्ठ पोलीस अधिकारी कृष्णकांत उपाध्याय यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की, शिवसेना नेते राजेश शाह यांचा 24 वर्षीय मुलगा मिहीर शाह गाडी चालवत होता. आरोपी दारूच्या नशेत होता अशीही शंका आहे. पण त्याच्या रक्त तपासणीच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे उपनेते राजेश शाह आणि चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतंल आहे. त्यांची चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान मिहीर शाह फरार असून पोलिसांची चार पथके त्याचा शोध घेत आहेत.
अपघातात जखमी झालेले प्रदीप नाखवा सकाळपासूनच पोलीस ठाण्यात थांबले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांना गहिवरुन आलं. त्यांनी सांगितलं की, "अपघात सकाळी 5.30 वाजता झाला. कार मागून आली आणि स्कूटरला धडकली. आमची गाडी एका कोपऱ्यातून 30-35 च्या स्पीडने चालली होती. धडक दिल्यानंतर आम्हाला काही वेळ काय झालं ते समजलंच नाही. आम्ही बोनेटवर पडलो. मी त्याला थांब म्हटल्यावर त्याने ब्रेक मारला असता आम्ही दोघे खाली पडलो. मी डाव्या बाजूला पडलो. मी तिला खेचणार तितक्यात त्याने तिच्या अंगावर गाडी घातली आणि फरफटत नेली. सीजी हाऊस ते सी-लिंक किती लांब आहे, काय तिची अवस्था झाली असेल सांगा". "मला दोन मुलं आहेत, आता मी काय करणार? हे मोठे लोक आहेत, कोणी काही करणार नाही. आम्हालाच त्रास होईल", असं ते म्हणाले आहेत.
पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे, ज्यामध्ये हत्या, बेदरकारपणे वाहन चालवणं आणि पुरावे नष्ट करणे यांचा समावेश आहे. मोटार वाहन कायद्यातील तरतुदीही लागू करण्यात आल्या आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, ही कार मिहिर शाहच्या नावावर नोंदणीकृत आहे. अपघाताच्या वेळी मिहीर शाह आणि त्यांचा चालक कारमध्ये होता. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मिहीर शाहने शनिवारी रात्री जुहू येथील एका बारमध्ये मद्यपान केलं. घरी जाताना त्याने ड्रायव्हरला लाँग ड्राईव्हला घेऊन जाण्यास सांगितलं. गाडी वरळीला आली आणि मग मिहीरने गाडी चालवण्याचा हट्ट धरला. त्याने स्टेअरिंग हातात घेतल्यानंतर काही वेळातच भरधाव वेगाने जाणाऱ्या बीएमडब्ल्यूने नाखवा दांपत्याच्या स्कूटरला धडक दिली.