'मी विराटचं अभिनंदन कशाला करु' म्हणणाऱ्या कुसल मेंडिसने मारली पलटी; आता म्हणतो 'मला खरं तर...'

विराट कोहलीने 49 वं शतक ठोकत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केल्यानंतर पत्रकाराने श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडिसला प्रतिक्रिया विचारली होती. यावर त्याने मी कशाला अभिनंदन करु असं म्हटलं होतं. त्याच्या या विधानावर क्रीडा विश्वातून नाराजी व्यक्त झाली होती.   

शिवराज यादव | Updated: Nov 12, 2023, 07:13 PM IST
'मी विराटचं अभिनंदन कशाला करु' म्हणणाऱ्या कुसल मेंडिसने मारली पलटी; आता म्हणतो 'मला खरं तर...' title=

वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान आपण केलेल्या एका विधानासाठी श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडिसने माफी मागितली आहे. विराट कोहलीने 49 वं शतक ठोकत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केल्यानंतर पत्रकाराने श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडिसला प्रतिक्रिया विचारली होती. यावर त्याने मी कशाला विराटचं अभिनंदन करु? असं म्हटलं होतं. त्याच्या या विधानावर क्रीडा विश्वातून नाराजी व्यक्त झाली होती. दरम्यान या टीकांनंतर कुसल मेंडिस त्यावर व्यक्त झाला असून स्पष्टीकरण दिलं आहे. 

"त्या दिवशी मी पत्रकार परिषदेला गेलो असता मला विराटने शतक ठोकल्याची कोणतीही कल्पना नव्हती. पत्रकार परिषदेत मला अचानक विराटच्या शतकाबद्दल विचारण्यात आलं. त्यावेळी काय बोलायचं हे मला सुचलं नाही. तसंच मला प्रश्नही नीट समजला नव्हता. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 49 शतकं ठोकणं सोपी गोष्ट नाही. विराट हा जगातील महान खेळाडूंपैकी एक आहे. नंतर मला मी काहीतरी चुकीचं बोललो असल्याचं लक्षात आलं," असं कुसल मेंडिसने एशियन मिररशी बोलताना सांगितलं. कुसल मेंडिसने माफी मागत मी वेगळ्या पद्धतीने व्यक्त व्हायला हवं होतं हे मान्य केलं आहे. 

भारतात सुरू असलेल्या वर्ल्डकपमध्ये श्रीलंका संघाची कामगिरी फार निराशाजनक राहिली आहे. श्रीलंकेला नऊ सामन्यात केवळ दोनच विजय मिळवता आले आणि उपांत्य फेरीसाठी पात्र होण्यात असमर्थ ठरले. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने शुक्रवारी क्रिकेट बोर्डाच्या कामकाजात सरकारी हस्तक्षेपाचे निरीक्षण केल्यानंतर पूर्ण सदस्य असलेल्या श्रीलंकेला निलंबित केले.

श्रीलंकेच्या संसदेने गुरुवारी एकमताने एक ठराव मंजूर केला, ज्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही पक्षांनी पाठिंबा देऊन देशाच्या क्रिकेट प्रशासकीय मंडळाला बरखास्त करण्याचे आवाहन केले. श्रीलंकेच्या संसदेने संमत केलेला ठराव हे सरकारी हस्तक्षेप दर्शवणारं होतं आणि तेच ICC बोर्डाला श्रीलंकेचे सदस्यत्व निलंबित करण्यासाठी पुरेसे कारण होते.

तत्पूर्वी, शेकडो लोकांनी श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या मुख्यालयाच्या आवारात येऊन व्यवस्थापनाच्या राजीनाम्याची मागणी केली. मुंबईत भारताविरोधातील सामन्यात श्रीलंकेचा संघ 55 धावांत गारद झाल्यावर राष्ट्रीय संघाच्या कामगिरीवर टीकेची झोड उठली होती. श्रीलंकेचा संघाला आशिया चषकातही भारताकडून वाईट पद्धतीने पराभव पत्करावा लागला होता.

याआधी आयसीसीने सर्वात प्रथम 2021 मध्ये सरकारच्या हस्तक्षेपामुळे झिम्बाब्वे क्रिकेटला निलंबित केलं होतं. यानंतर श्रीलंका हे दुसरं बोर्ड ठरलं आहे.